Home » कृषी » हापुस आंब्याच्या हंगामाला सुरवात ; आवक वाढल्याने दर आवाक्यात

हापुस आंब्याच्या हंगामाला सुरवात ; आवक वाढल्याने दर आवाक्यात

कोकण, दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्रात हापूस आंब्याचे दोन मुख्य हंगाम मानले जातात. ‘फेब्रुवारी ते मार्च’ आणि ‘एप्रिल ते मे’ , त्यानुसार पहिल्या हंगामात वाशीच्या घाऊक बाजारात दररोज दीड ते दोन हजार आंब्याच्या पेट्या येत आहेत. बाजारात हापूस आंब्याची आवक वाढल्यामुळे दर तुलनेने कमी झाले आहेत.

घाऊक बाजारात दोन डझनाच्या कच्च्या हापूस आंब्याच्या पेटीला २,५०० ते ४,००० रुपये भाव मिळत आहे. याउलट पिकलेल्या हापूसचे दर जास्त असल्याचे व्‍यापाऱ्यांनी सांगितले. नोव्‍हेंबरमध्ये कोकणातील दोन-चार पेट्यांवरून सुरू झालेली हापूसची आवक आता तब्बल दीड ते दोन हजार पेट्यांपर्यंत वाढली आहे. गुरुवारपासून ही आवक आणखी वाढणार असा अंदाज आहे .
हंगाम येण्याआधी हापूसला बाजारात मागणी असते. नोव्‍हेंबमध्ये आवाक कमी असल्या कारणाने भाव देखील जास्त असतात, हे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात.

यावर्षी चांगला मोहोर असल्याने उत्पादन देखील चांगले मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे हा हंगाम चांगला जाण्याचा विश्‍वास व्‍यापारी वर्गाने व्‍यक्त केला आहे. खवय्यांना आनंदाची गोष्ट म्हणजे मार्च आणि एप्रिलमध्ये बाजारात हापूसची आवक आणखी वाढेल. त्यामुळे दर आवाक्यात येऊन खवय्यांना त्याचा मनसोक्त आस्वाद घेता येणार आहे. सध्या रत्नागिरीतून आवक कमी असल्याने देवगडमधून हापूस आंबा बाजारात येत आहे. लवकरच रत्नागिरीतून देखील आवक वाढेल असा विश्वास आंब्याचे घाऊक व्यापारी शिवाजीराव चव्हाण यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!