मुंबई, दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – सौरऊर्जा आणि शास्वत विकासाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘पंतप्रधान सूर्य घर-मोफत वीज योजना ‘ सुरु केली आहे. या योजने अंतर्गत साधारण १ कोटी घरांपर्यंत वीज घेऊन जाण्याचे तसेच प्रतिमहिना ३०० यूनिट्स पर्यंतची वीज मोफत देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
योजनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानुसार “शास्वत विकास आणि लोक कल्याणासाठी आम्ही ‘पीएम सूर्य घर-मोफत वीज योजना’ सुरू करत आहोत. या प्रकल्पासाठी ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून साधारण १ कोटी घरांना प्रतिमहिना ३०० यूनिट्स मोफत वीज मिळवून देण्याचा आमचा उद्देश आहे,” असे मोदी म्हणाले.
योजनेचा प्रचार-प्रसार करण्याचे आवाहन –
या योजनेचा फायदा जास्तीत जास्त लोकांना मिळावा म्हणून योजनेचा प्रचार-प्रसार व्हावा, यासाठी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायती यांनी रुफटॉप सोलार सिस्टिम बसवण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन मोदी यांनी केले.
नोंदणी करण्याचे मोदींचे आवाहन –
“या योजनेमुळे रोजगारनिर्मिती होईल तसेच कमी वीजबील येईल. चला सौरउर्जा आणि शास्वत विकासाला चालना देऊ. मी सर्व ग्राहकांना विशेषत: तरुणांना आवाहन करतो की त्यांनी पंतप्रधान सूर्य घर-मोफत वीज योजनेला आणखी बळकट करावे. त्यांनी https://pmsuryaghar.gov.in या लिंकला भेट देऊन आपली नोंदणी करावी,” असे आवाहनही मोदी यांनी केले.
