जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र आयोजित “मॉक पार्लियामेंट” या विषयावरील वादविवाद स्पर्धेत यश मिळविले ही स्पर्धा आपत्कालीन स्थितीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त दि २३ जून २०२५ रोजी दापोरीकर हॉल जळगाव येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयाचे आयुषी ओच्छानी, हर्षा ओच्छानी, मृणाल पाटील, अजय पाटील, दिवेश सोनवणे विद्यार्थी सहभागी झाले होते. ६० सहभागींपैकी, हर्षा ओच्छानी हिने उतेर्जनार्थ व उत्कृष्ट स्पीकर म्हणून क्रमांक मिळवला. तिने या मॉक पार्लमेंटमध्ये भाजप पक्षाचे प्रतिनिधित्व केले. मृणाल पाटील यांनी वित्त मंत्री व दिवेश सोनावणे शिक्षण मंत्री पद भूषवले.
या सत्रामध्ये १९७५ ते १९७७ कालखंड पुन्हा उभा करण्यात आला होता, जिथे भाजप सत्ताधारी पक्ष आणि काँग्रेस विरोधी पक्ष होता. हा कार्यक्रम भारतीय संविधानावर आधारित संसद सत्राच्या स्वरूपात आयोजित केला गेला होता. प्रत्येक सहभागीला ९० सेकंदांचा वेळ दिला गेला होता आपले विचार मांडण्यासाठी. इतर स्पर्धकांच्या मतांवर शंका व्यक्त करायची असल्यास, सहभागींना आपला क्रमांक असलेली बॅच उचलून प्रश्न विचारण्याची संधी मिळाले. एकूण दोन सत्रांमध्ये ही प्रक्रिया पार पडली.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते झाले. विशेष अतिथी म्हणून विश्वास कुलकर्णी उपस्थित होते, ज्यांनी आपत्कालीन काळात कारावास भोगलेला असून, त्या अनुभवाविषयी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.
कार्यक्रमासाठी प्रा. विजय एन. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना समन्वयक म्हणून साथ दिली. प्रथम वर्ष अभियांत्रिकी संगणक विभागातील विद्यार्थिनी मृणाल पाटील यांनी कार्यक्रमाच्या शेवटी मनोगत व्यक्त केले. या यशाबद्दल प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन, अकॅडमिक डीन सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक वृंद यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
