जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एकलव्य क्रीडा संकुलाच्या एकलव्य रायफल व पिस्तोल शूटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी अमरावती येथे नुकत्याच पार पडलेल्या इंटर बटालियन शूटिंग स्पर्धेत दमदार कामगिरी करत स्पर्धेवर आपली छाप सोडली. स्पर्धेतील ५० मीटर थ्री पी रायफल या प्रकारात पाच खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत तुषार जाधव आणि आर्या भालेराव यांनी सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले, तर मोहिनी सपकाळे आणि यश सोनवणे यांनी कास्य पदक मिळवून आपल्या कलेची छाप पाडली. दीपेश तायडे व वैष्णवी सपकाळे यांनीही उल्लेखनीय कामगिरी करत कोल्हापूर येथे होणाऱ्या जी. व्ही. मालवणकर ऑल इंडिया शूटिंग चॅम्पियनशिप (ऑगस्ट २०२५) या राष्ट्रीय स्पर्धेकरिता आपली पात्रता सिद्ध केली आहे.
सदर खेळाडूंना एकलव्य क्रीडा संकुलाची प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकलव्य रायफल व पिस्तूल शूटिंग अकादमीचे प्रशिक्षक श्री सागर सोनवणे यांनी प्रशिक्षण दिले. खेळाडूंच्या या यशाबद्दल की.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, कोषाध्यक्ष डी.टी. पाटील तसेच एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
