विद्यापीठाची मनमानी : बेकायदा शिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणारे प्रशासन पात्र उमेदवारावर अन्याय का करतेय?
जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क
जळगाव : एकिकडे उच्च शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने स्वतःच एक धक्कादायक आणि अनाकलनीय निर्णय घेतला आहे. मास कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम विभागात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी सर्वाधिक ८० गुण मिळवूनही, केवळ ‘एलएल.बी.’ चे शिक्षण घेत असल्याचे कारण पुढे करत डॉ. संजय भोकरडोळे यांची नियुक्ती नाकारण्यात आली आहे. विद्यापीठाच्या या मनमानी कारभारामुळे शैक्षणिक वर्तुळात संताप व्यक्त होत असून, पात्र उमेदवाराच्या घटनात्मक अधिकारावर गदा आणली जात असल्याचा आरोप होत आहे.
नेमकी पार्श्वभूमी काय?
विद्यापीठाने सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी जाहिरात क्र. २/२०२५ प्रसिद्ध केली होती. यामध्ये मास कम्युनिकेशन विभागासाठी ४ जागा होत्या. डॉ. भोकरडोळे यांनी ईडब्ल्यूएस (EWS) आरक्षणातून अर्ज केला होता. १२ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या मुलाखतींमध्ये डॉ. भोकरडोळे हे सर्वाधिक ८० गुण मिळवून गुणवत्तेत सर्वश्रेष्ठ ठरले होते. मात्र, २३ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीत त्यांना ‘अपात्र’ ठरवण्यात आले. अपात्रतेचे कारण देताना ते ‘एलएल.बी. चे शिक्षण घेत आहेत’ असा अजब शेरा मारण्यात आला.
विद्यापीठाचा दुजाभाव आणि नियमबाह्य कृती
धक्कादायक बाब अशी की, शिक्षण घेत असताना नियुक्ती देता येत नाही, असा कोणताही अधिकृत नियम अस्तित्वात नाही. स्वतः डॉ. भोकरडोळे यांनी माहिती अधिकारात (RTI) विचारणा केली असता, असा कोणताही नियम नसल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असतानाही केवळ द्वेषबुद्धीने ही नियुक्ती रोखल्याचा आरोप डॉ. भोकरडोळे यांनी केला आहे.

विशेष म्हणजे, विद्यापीठात कार्यरत असलेले अनेक कायमस्वरूपी कर्मचारी कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय बेकायदा एलएल.बी., एलएल.एम. यांसारख्या पदव्या घेत आहेत. यात काही माजी कायदा अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची चर्चा आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करणारे विद्यापीठ प्रशासन, एका गुणवंत उमेदवाराला मात्र शिक्षणाचे कारण देऊन डावलत आहे.
न्यायालयात जाण्याचा कुलगुरूंचा सल्ला
या अन्यायाबाबत डॉ. भोकरडोळे यांनी कुलगुरू आणि प्र-कुलगुरूंची भेट घेऊन लेखी निवेदन दिले. प्रसंगी विद्यापीठाची अट असल्यास एलएल.बी. शिक्षण सोडण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. मात्र, प्रशासनाने त्यांच्या विनंतीला केराची टोपली दाखवत, “न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत, तिथे जा” असा उद्दामपणाचा सल्ला दिला आहे.
गुणांची आकडेवारी (छाननी समिती अहवालानुसार):
मुलाखतीला उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या गुणांकडे पाहिल्यास डॉ. भोकरडोळे यांचे वर्चस्व स्पष्ट दिसते:
• डॉ. संजय भोकरडोळे – ८० गुण
• गोपीचंद सोरडे – ७८ गुण
• संजय कुमार पुंडगे – ४३ गुण
• विजय चव्हाण – ४१ गुण
• गौरव हरताळे – ४० गुण
एवढ्या मोठ्या फरकाने आघाडीवर असलेल्या उमेदवाराला डावलणे, हे केवळ शैक्षणिक नुकसान नसून घटनात्मक आरक्षणाचा आणि गुणवत्तेचा अपमान आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.
"मी सर्वाधिक पात्र उमेदवार असूनही केवळ द्वेषबुद्धीने मला नियुक्ती नाकारली जात आहे. हा माझ्यावर झालेला घोर अन्याय असून विद्यापीठ प्रशासनाने आपली मनमानी थांबवून मला तात्काळ नियुक्ती द्यावी."
- डॉ. संजय भोकरडोळे
