छत्रपती संभाजीनगर l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क
महायुतीतील भाजप-शिवसेना (शिंदे) वादाचे नवे प्रकरण बुधवारी छत्रपती संभाजीनगरात उघड झाले. अनेक ठिकाणी शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले जात असल्याच्या तक्रारी घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कालच दिल्लीला जाऊन आले होते. मात्र, या भेटीचा काहीही उपयोग झाला नाही. आज, दुसऱ्याच दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला पूर्णपणे बाजूला सारत एकट्याने सत्ता मिळवली. अध्यक्षपदी भाजपचे अविनाश गलांडे आणि उपाध्यक्षपदी भाजपचेच जितेंद्र जैस्वाल यांची बिनविरोध निवड झाली.
शिवसेना सदस्यांची गैरहजेरी आणि ठाकरेंच्या गटाला ‘व्हीप’
सत्तेत वाटा मिळेल, या आशेने शिंदेंची शिवसेना बैठकीत सहभागी होण्याची सारेच वाट पाहत होते, पण घडले वेगळेच. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रक्रियेत शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य गैरहजर राहिले, तर उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हा परिषद सदस्यांना मतदान प्रक्रियेत भाग घेऊ नये, यासाठी व्हीप बजावला गेला होता. चार अपक्षही भाजपच्या बाजूने मतदान करणार असल्याने भाजपलाच अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद मिळणार, हे स्पष्ट झाले होते.

संख्याबळाचे गणित: युती असूनही फिस्कटले समीकरण
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत भाजपचे २३ तर शिवसेना शिंदे गटाचे २१ सदस्य आहेत. उद्धव ठाकरे गटाचे ९, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ तर काँग्रेस आणि प्रहार संघटनेचा प्रत्येकी एक सदस्य निवडून आला आहे. म्हणजे भाजप आणि शिंदे सेना मिळून ४४ सदस्य असताना, उपाध्यक्षपद शिंदे सेनेला मिळाले असते. मात्र, स्थानिक पातळीवरील सत्तालालसेने युतीचे गणित पूर्णपणे बिघडवले.
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी: “केसाने गळा कापला” की “नेत्यांची महत्त्वाकांक्षा”?
नेमके काय घडले, याबाबत दोन्ही पक्षांनी परस्परांवर आरोपांचे सत्र सुरू केले आहे. भाजपच्या म्हणण्यानुसार, स्थानिक शिवसेना नेत्याला स्वतःच्या मुलाला उपाध्यक्षपदावर बसवायचे होते, त्यासाठी त्यांनी स्वतंत्र प्रयत्न केले, गोव्यापर्यंत वारीही झाली — मात्र हे गणित जमले नाही. “आम्ही वाट पाहिली, ते आलेच नाहीत, त्यांना ठरल्याप्रमाणे उपाध्यक्षपद दिले असते,” असे भाजपने सांगितले. तर शिवसेनेने “भाजपने केसाने गळा कापला” असा थेट आरोप केला.
महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर; शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर
यानंतर, रायगडमध्ये बहुमत असूनही तडजोड, फलटणमध्ये सत्तेपासून दूर — अशी खंत स्थानिक शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे. दिल्लीत मोदी-शाहांशी बैठका होतात, आश्वासने मिळतात — पण जमिनीवर जिल्हा परिषदेत शिवसेनेची कोंडी कायम राहते. छत्रपती संभाजीनगरची घटना ही महायुतीतील सत्तावाटपाच्या धुसफुसीचे ताजे आणि बोलके उदाहरण ठरली आहे.

