Headlines
Home » जळगाव » जळगाव शिक्षण विभागात ‘शालार्थ आयडी’चा मोठा घोटाळा; ६६१ कर्मचाऱ्यांचे आदेश संशयाच्या भोवऱ्यात

जळगाव शिक्षण विभागात ‘शालार्थ आयडी’चा मोठा घोटाळा; ६६१ कर्मचाऱ्यांचे आदेश संशयाच्या भोवऱ्यात

जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क

​जळगाव जिल्ह्यातील शिक्षण विभागात ‘शालार्थ आयडी’ संदर्भात एक खळबळजनक प्रकार समोर आला असून, तब्बल ६६१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आदेशांमध्ये गंभीर अनियमितता आढळून आली आहे. विशेष म्हणजे, यातील अनेक आदेशांची अधिकृत ‘जावक रजिस्टर’मध्ये नोंदच नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

नेमका प्रकार काय?
​शिक्षण विभागाच्या मूळ जावक रजिस्टरची पडताळणी केली असता, अनेक कर्मचाऱ्यांच्या आदेशांवरील जावक क्रमांक, दिनांक आणि शाळांची नावे अधिकृत नोंदींशी जुळत नसल्याचे उघड झाले आहे. काही कर्मचाऱ्यांच्या आदेशाबाबतीत रजिस्टरमध्ये चक्क खाडाखोड झाल्याचेही आढळून आले.

• ​गहाळ नस्त्या (Files): २९४ कर्मचाऱ्यांच्या आदेशांच्या नोंदी असल्या तरी, त्यांच्या प्रत्यक्ष फायली (नस्त्या) कार्यालयात उपलब्ध नाहीत.
• ​बनावटगिरीचा संशय: खोटे शालार्थ आदेश तयार करून, ते खरे असल्याचे भासवून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्था चालक आणि तत्कालीन शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुढील कारवाई आणि चौकशी
​शिक्षण उपसंचालकांमार्फत सध्या कागदपत्रांची सखोल तपासणी सुरू आहे. ज्या २९४ कर्मचाऱ्यांच्या फायली मिळत नाहीत, त्यांच्या अभिलेख्यांची पुन्हा पाहणी केली जाणार आहे. संबंधित संस्था, शाळा आणि कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी केल्यानंतरच हे शालार्थ आदेश ‘योग्य की अयोग्य’ याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

या घोटाळ्याची व्याप्ती बघता आगामी काळात बोगस शालार्थ आयडी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत अजून वाढ होते का, तसेच या कथित घोटाळ्यात सहभागी असलेले अधिकारी, कर्मचारी, संस्थाचालक यांच्या विरोधात काय कारवाई होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!