Headlines
Home » महाराष्ट्र » सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा पहिला पदवीप्रदान समारंभ संपन्न

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा पहिला पदवीप्रदान समारंभ संपन्न

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत बाबी लागू करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न प्रशंसनीय : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

पुणे ( वास्तव पोस्ट ) : संशोधन चलित शिक्षण, आंतरविद्याशाखीय शिक्षण आणि शैक्षणिक बाबींसाठी उद्योगांसमवेत सहयोग या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत बाबी लागू करण्याचा सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा प्रयत्न प्रशंसनीय आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी काढले.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पहिल्या पदवीप्रदान समारंभात राज्यपाल बोलत होते. यावेळी विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, कुलगुरू प्रा. सुनील भिरुड, कुलसचिव डॉ. दयाराम सोनवणे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. यशोधरा हरिभक्त आदी उपस्थित होते.

सीओईपी ही संस्था शैक्षणिक उत्कृष्टतेची दीपस्तंभ असून संस्थेच्या पहिल्या पदवीदान समारंभास उपस्थित राहताना आनंद होत असल्याचे सांगून राज्यपाल म्हणाले. आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याच्या अनुषंगाने माहिती देताना राज्यपाल म्हणाले, या विद्यापीठाचा उद्देश हा आदिवासींना केवळ आदिवासी म्हणून ठेवण्याचा नव्हे तर त्यांच्यात जगाशी स्पर्धा करण्याची क्षमता निर्माण करणे हा असावा.

शिक्षण, नवनिर्मिती आणि सांस्कृतिक विकासात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या व्यावसायिक जीवन प्रवासाला सुरुवात करत असताना, या राज्याचा वारसा पुढे नेण्यासाठी त्याच्या विकासात आणि समृद्धीसाठी हातभार लावावा, अशी अपेक्षाही राज्यपालांनी व्यक्त केली.

यावेळी कुलगुरू डॉ. सुनिल भिरूड यांनी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या भविष्यकालीन उपक्रमांबाबत माहिती देऊन विद्यापीठ अहवालाचे वाचन केले. कार्यक्रमास विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!