जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मागील काही वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात विविध विभागात लाचखोरीचे प्रकरण उघडकीस येत आहेत. शिक्षण क्षेत्र हे विद्येचे माहेर घर म्हणून ओळखले जाते. परंतु विद्येच्या या घरातील काही लोकांनामुळे शिक्षणक्षेत्र देखील आता लाचखोरीच्या रडारावर आले आहे.
दरम्यान शिक्षण क्षेत्रात लाचखोरीची एक घटना जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात समोर आली आहे. श्री.संत हरिहर माध्यमिक विद्यालय निपाणे या शाळेतील एका शिपाईच्या वेतनातील थकीत फरकाची रक्कम मंजूर करण्यासाठी १० हजारांची लाच घेणाऱ्या संदीप प्रभाकर महाजन नामक मुख्याध्यापकास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.
याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारदार हे श्री.संत हरिहर माध्यमिक विद्यालय निपाणे येथील शाळेत शिपाई या पदावर नोकरीस असुन त्यांचे वेतनातील फरकाची रक्कम रक्कम २ लाख ५३ हजार ६७० रुपये मंजूर करण्याचा प्रस्ताव त्यांनी जळगाव माध्यमिक शिक्षण विभागाकडे पाठवला होता.
दरम्यान त्याच शाळेत कार्यरत असलेले मुख्याध्यापक संदीप महाजन यांनी हा प्रस्ताव मंजूर करून देतो असे सांगून मंजूर रकमेच्या ५% म्हणजे १२,५०० रुपयांची लाचेची मागणी केली होती. मात्र तडजोड करून शेवटी १० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलूचपत विभागाला तक्रार दिली. सदर तक्रारी नुसार पंचांसमक्ष पडताळनी करण्यात येऊन ठरल्याप्रमाणे पथकाने दिनांक २७ जून गुरुवार रोजी दुपारी सापळा लावून शाळेच्या कार्यालयात १० हजारांची रक्कम घेतांना मुख्याध्यापक संदीप महाजन यास पथकाने रंगेहात पकडले.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा पर्यवेक्षक अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक अमोल वालझडे यांच्यासह सापळा पथकातील पीएसआय दिनेशसिंग पाटील, पो.ना. बाळू मराठे आदींनी सहभाग घेतला.

