Home » क्रीडा » “आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५” मध्ये टीम इंडियाची विजयी सलामी ; गिलचे शानदार शतक

“आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५” मध्ये टीम इंडियाची विजयी सलामी ; गिलचे शानदार शतक

दुबई ( वास्तव पोस्ट ) : भारतीय क्रिकेट संघाने ICC Champions Trophy 2025 मध्ये शानदार सुरुवात केली आहे. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा ६ विकेट्सने पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार विजयाने सुरुवात केली. भारताच्या विजयात युवा सलामीवीर शुभमन गिलने महत्त्वाची भूमिका बजावली.

गिलने शानदार खेळी करत सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासाठी शतक झळकावण्याचा महान पराक्रम केला. गिलने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले. त्याने १२५ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. यापूर्वी, गिलने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यातही शतक झळकावले होते. 

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण त्यांची सुरुवात निराशाजनक झाली. संघाचे ५ फलंदाज अवघ्या ३५ धावांच्या आत पॅव्हेलियनमध्ये परतले. नंतर, जाकर अली आणि तौहीद हृदयॉय यांनी सहाव्या विकेटसाठी १५४ धावांची विक्रमी भागीदारी करून बांगलादेशला २२८ धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. जाकेर अलीने ६८ धावांची खेळी खेळली. तर, तौहीद ने १०० धावा केल्या.

भारताकडून शमीची भेदक गोलंदाजी

मोहम्मद शमीने आपल्या दहा षटकांत ५३ धावा देत ५ फलंदाजांचे बळी घेतले. याचबरोबर  एकदिवसीय सामन्यात सर्वात कमी चेंडूत २०० बळी पूर्ण करण्याचा विश्वविक्रम केला. त्याने मिचेल स्टार्कचा सर्वात कमी चेंडूत २०० बळी घेण्याचा विक्रम मोडला. हर्षित राणाने ३ गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली. तर अक्षर पटेल ने २ गडी बाद केले.

बांगलादेशच्या २२८ धावांच्या प्रत्युत्तरात भारताची सुरुवात चांगली झाली. १० षटकांत १ विकेट गमावल्यानंतर टीम इंडियाने धावफलकावर ६९ धावा लावल्या. रोहित शर्मा ४१ धावा करून बाद झाला. यानंतर, विराट कोहली क्रीजवर आला, जो फक्त २२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मधल्या फळीत श्रेयस अय्यर (१५) आणि अक्षर पटेल (८) फारसे काही करू शकले नाहीत आणि स्वस्तात बाद झाले.

गिलचे नाबाद शतक

यादरम्यान, गिल दुसऱ्या टोकाला खंबीरपणे उभा राहिला आणि नंतर केएल राहुलसोबत ८७ धावांची भागीदारी केली आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. केएल राहुलने ४१ धावांची नाबाद खेळी केली. केएलने त्याच्या डावात १ चौकार आणि २ षटकार मारले. १२९ चेंडूत १०१ धावा करून गिल नाबाद परतला. या विजयासह टीम इंडियाच्या खात्यात २ गुण जमा झाले आहेत. आता टीम इंडियाचा दुसरा सामना पाकिस्तानशी होईल. हा सामना २३ फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये खेळला जाईल. 

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!