छगन भुजबळ आणि राज ठाकरेंवर जोरदार फटकेबाजी
अहमदनगर दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. त्यापूर्वी त्यांनी राज्याच्या काही भागात दौरा केला. त्यांची शेवटची सभा शुक्रवारी रात्री श्रीगोंदा तालुक्यात झाली. यामध्ये त्यांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांवर तुफान फटकेबाजी केली. नाव घेता एकाला टोळीचा मुकादम असा तर दुसऱ्याला गल्लीबोळात बडबड करणारा पुढारी असा उल्लेख जरांगे पाटील यांनी केला.
सकल मराठा समाजाच्या वतीने श्रीगोंदा तालुक्यातील औटेवाडी येथे त्यांच्या सभेला नेहमीप्रमाणे मोठी गर्दी झाली. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, आपल्या मुंबईतील मोर्चानंतर राज्य सरकारने जी अधिसूचना काढली आहे, त्याचे कायद्यात रूपांतर होईपर्यंत व मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणार आहोत. यासाठीच शनिवारपासून (१० फेब्रुवारी) पुन्हा उपोषणाची सुरवात करणार आहे. येत्या दोन दिवसात अधिवेशन बोलावून त्याचे कायद्यात रूपांतर करा. त्याचा अहवाल न्यायालयात ठेवा, अशी आपली मागणी आहे. मराठा आरक्षणाची सुरुवात आण्णासाहेब पाटील यांनी केली होती. पंरतु काहींनी ती मोडीत काढली. मराठे आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला गेले आणि शांततेत आरक्षण घेऊन आले. त्यानंतर आता मी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन आलो आहे. आता आरक्षणाची लढाई टोकाची होणार आहे. मी असेन नसेन माहीत नाही, माझे विचार आणि माझी जात फुटू देऊ नका, असे भावनिक आवाहन जरांगे पाटील यांनी सभेत केले.
