सामान्य नागरिकांच्या मनात एकच प्रश्न…
“महाराष्ट्र सुरक्षीत आहे का ?”
महाराष्ट्रात सध्या सुरक्षेच्या मुद्द्यावर गहन चर्चा सुरू आहे. या चर्चेचा मुख्य विषय म्हणजे बॉलीवुड अभिनेता सैफ अलीवर झालेला चाकू हल्ला. वांद्रे येथील सैफ च्या घरामध्ये दि.१६ जानेवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मुंबईतील एवढ्या मोठ्या हायप्रोफाईल सोसायटीत हल्लेखोर शिरलाच कसा? असा सवाल सध्या चर्चेत आहे. मुंबईतील वांद्रे येथील सतगुरू शरण सोसायटीत सैफ अली खान १२ व्या मजल्यावर राहतो. या घटनेमुळे राज्याची सुरक्षा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली.
परभणी येथील हिंसाचारामुळे महाराष्ट्र चांगलाच चर्चेत आला. येथे संविधानाच्या प्रतिकृतीच्या झालेल्या विटंबनेचे तीव्र पडसाद राज्यात तसेच राज्याबाहरे देखील उमटले. दरम्यान हिंसाचारात अनेकांना अटक करण्यात आली. तर पोलीस कोठड़ीत एकाचा बळी देखील गेला. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने मात्र सर्वांचे लक्ष वेधले. कारण या प्रकरणाने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या घटनांमुळे नागरिकांच्या मनामध्ये एक भीतीचा छाया पसरला आहे, जो त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत आहे.
गेल्या काही दिवासात बॉलीवुड स्टार सलमान खानला मिळालेली धमकी, त्याच्या बंगल्यावर झालेला गोळीबार, बाबा सिद्दीकी यांचा खून, संतोष देशमुख हत्याकांड, शाहरुख खान याच्या मन्नत बंगल्याची रेकी आणि आता सैफ अली खान वर झालेला चाकू हल्ला… अशा अनेक गुन्हेगारी घटनांमुळे सामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षा हा एक चिंतेचा विषय बनला आहे.
सलमान खान, जो एक प्रसिद्ध चित्रपट अभिनेता आहे, त्याच्या सुरक्षेसाठी अनेक सुरक्षा यंत्रणांचा वापर केला जातो, तरीही त्याला धमकी देण्यात आली आहे. ज्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आणि सामान्य जनतेमध्ये एक अनिश्चितता निर्माण झाली आहे. याशिवाय, बाबा सिद्दीकी यांच्या खूनाची घटना म्हणजे भविष्यात महाराष्ट्रातील गुन्हेगारी वाढण्याचा हा जणुकाही इशाराच आहे. या हत्येमुळे समाजात एक भयावह वातावरण निर्माण झाले आहे. हत्याकांडांमध्ये वाढ झाल्याने सामान्य लोकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सैफ अली खानवर चाकू हल्लामुळे सेलिब्रिटींच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. या घटनांनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला धोक्यात आणले आहे. सेलिब्रिटींना सुरक्षेच अत्यावश्यक गरज भासू लागली आहे, तर सामान्य माणसाने क़ाय करावे. मोठ्या शहरांबरोबरच जिल्हा तसेच तालुका आणि गांव पातळीवर देखील अवैध धंधे, वाळूमाफिया, हप्ता वसूली आदी अनेक कारणांमुळे गुन्हेगारी वाढली आहे.
अशा या सर्व घटनांनी महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांच्या मनात एक मोठा प्रश्न उपस्थित केला आहे, तो म्हणजे – “महाराष्ट्र सुरक्षित आहे का?” या प्रश्नाने आता सरकार आणि सुरक्षा यंत्रणांना आपल्या कार्य प्रदर्शनावर पुन्हा विचार करण्यास भाग पाडले आहे. राज्यातील सुरक्षेच्या यंत्रणांना या गंभीर घटनांवर तात्काळ आणि प्रभावी कारवाई करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा जनतेचा विश्वास कमी होईल. सुरक्षा यंत्रणांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे, जेणेकरून जनतेला सुरक्षिततेची भावना मिळू शकेल.
सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणे हे आपले देखील कर्तव्य आहे, आणि सरकारने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, ज्यामुळे समाजातील सर्व स्तरांवर एक सुरक्षीत वातावरण निर्माण होईल. याचबरोबर, नागरिकांनी देखील सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करणे आवश्यक आहे, त्यामुळे एकत्रितपणे आपण एक सुरक्षित समाज निर्माण करू शकू.
श्री. संदीप बी. रंधे
वास्तव पोस्ट, जळगाव
