जळगाव ( वास्तव पोस्ट ) : धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंगळवार दि.३१ डिसेंबर रोजी रात्री दोन गटात संघर्ष होऊन काही दुकानांची तसेच वाहनांची जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी गावातील परिस्थिती नियंत्रणात आणली असून तणावपूर्ण शांतता असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार गावातून काही वाहने जात असतांना, त्यातील एका वाहनाचा कट लागल्याने, या वाहनांच्या दिशेने बघून काही तरुणांनी शिवीगाळ केली. या प्रकारावरुन दोन गटांमध्ये हाणामारीला सुरुवात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हिंसेप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. दोषींवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
■ पाळधी येथील परिस्थिती नियंत्रणात :
दरम्यान मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार काल रात्री नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरु असल्याने सर्वत्र धामधुम सुरू होती. अशातच धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मात्र दोन गटांमध्ये वाद होऊन रात्री दहा वाजेनंतर मोठा उद्रेक झाला. वादाची माहिती मिळताच दोन्ही गटांकडील समर्थक रस्त्यावर आल्याने परिस्थिती आणखीनच चिघळली. त्यात जमावातील काही जणांनी दुकानांना, तसेच वाहनांना आग लावली. तसेच गावातील फलक आणि इतर वाहनांची तोडफोड देखील केली. यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

■ पोलिसांसह दंगल नियंत्रक पथक पाळधीत :
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाळधी व धरणगावच्या पोलिसांसह दंगल नियंत्रक पथकाने संतप्त जमावाला शांत केले. तसेच अग्नीशामक दलाच्या बंबांनी दुकानांना लावलेली आग विझवली. दरम्यान, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी घटनेतील काही संशयीतांना तात्काळ ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. तर याबाबत रात्री उशीरापर्यंत पाळधी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

घटनेनंतर रात्री उशिरा दि.१ जानेवारी २०२५ बुधवार रोजी सकाळी ३ वाजेपासुन ते दि.२ जानेवारी २०२५ गुरुवार सकाळी ६ वाजेपर्यंत पाळधी गावात संचारबंदी लागू करण्यात आली असून, रस्त्यावर जो कोणी दिसेल त्यावर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आले. संचारबंदी बाबत पोलिस आपल्या वाहनातील ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून गावातील लोकांना सूचित करत आहेत.
पाळधी गावात सध्या वातावरण हे पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच कालच्या घटनेबद्दल समाजमाध्यमांवर कुणीही अफवा पसरवू नये, असे आवाहन देखील पोलिस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे.
