मुंबई ( वास्तव पोस्ट ) : भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांची महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात निवड झाल्यानंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षपदी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. पुढच्या वर्षी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे भाजप मुंबई अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आशिष शेलार यांची ऑगस्ट २०२२ मध्ये भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.
दरम्यान मे महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्यामुळे पक्षाचे अध्यक्षपद अत्यंत महत्त्वाचे आहे. आशिष शेलार यांच्यानंतर मुंबई विधानसभा मतदार संघातील आमदार अमित साटम, अतुल भातखळकर, पराग अलवाणी आणि संजय उपाध्याय यांची नावे चर्चेत आहेत.
यापैकी संजय उपाध्याय हा उत्तर भारतीय चेहरा आहे. अमित साटम हे अंधेरी पश्चिम मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. तर, अतुल भातखळकर- कांदिवली पूर्व, पराग अलवानी-नविले पार्ले आणि संजय उपाध्याय हे बोरीवली मतदारसंघातून विजयी झाले.
बीएमसी निवडणुकीपूर्वी भाजप कोणती भूमिका घेते हे पाहायचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संजय उपाध्याय यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी देऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. संजय उपाध्याय यांच्याकडे यापूर्वी २०११ मध्ये मुंबई भाजपचे सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली होती. तेव्हा ते मुंबई भाजपचे सर्वात तरुण सरचिटणीस बनले होते. तेव्हापासून त्यांनी संघटनेत अनेक पदे भूषवली आहेत. तसेच अमित साटम हे संघाचे अत्यंत जवळचे मानले जातात.
