Home » जळगाव » शहरात अपघातांची मालिका सुरुच ; भरधाव डंपरने दुचाकीस धडक दिल्याने ९ वर्षीय बालकाचा मृत्यू !

शहरात अपघातांची मालिका सुरुच ; भरधाव डंपरने दुचाकीस धडक दिल्याने ९ वर्षीय बालकाचा मृत्यू !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरात अपघातांची मालिका ही सुरुच आहे. गेल्या पाच दिवसांपासून शहरात अपघात होतं असून त्यात निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. जळगाव शहरात अवजड वाहतुकीमुळे होणारे अपघात लक्षात घेता वाहतुकीच्या दृष्टीने नुकतीच एक नियमावली जारी करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही अपघातांचे सत्र थांबलेले नाही.

दरम्यान आज दि.२६ रोजी शहरातील कालिकामाता चौकात रेतीने भरलेल्या भरधाव डंपरने एका मोटारसायकलीस धडक दिल्याने नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. तर बालकासोबतचे दोघेही जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना बुधवारी २५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. योजस धीरज बहाटे (९ वर्ष, रा. लीला पार्क, अयोध्या नगर) असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे.

बहीण आणि मामा हे किरकोळ जखमी

जेवणाचे पार्सल घेण्यासाठी मामासोबत दुचाकीवर जात असलेल्या एका ९ वर्षीय भाच्याचा मृत्यू झाला आहे. सोबत असलेली त्याची बहीण आणि मामा हे किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान या अपघाताची माहीती कळताच परिसरातील नागरिकांनी अपघाताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.

संतप्त नागरिकांनी महामार्गावर रस्तारोको आंदोलन सुरु केले. त्यामुळे दोन्ही बाजुची वाहतूक खोळंबुन महामार्गावर वाहानांच्या रांगा लागल्या. अशातच संतप्त नागरिकांनी उभा डंपर पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

काय घडलं नेमकं ?

योजस हा चिमुकला आई-वडील आणि बहीण भक्ती धीरज बहाटे (१३) यांच्यासोबत अयोध्या नगरातील लीला पार्क परिसरामध्ये वास्तव्यास होता. बुधवार, दि. २५ डिसेंबर रोजी भादली येथील मामा योगेश हरी बेंडाळे हे त्यांच्या घरी आले होते. संध्याकाळी जेवणाचं पार्सल घेण्यासाठी योगेश बेंडाळे हे ७:१५ वाजेच्या सुमारास भाची भक्ती आणि भाचा योजस आपल्या मामासोबत दुचाकीने कालिका माता चौकातून जात असतांना पाठीमागून आलेल्या रेतीने भरलेल्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत योजस बहाटे हा चिमुकला जागीच ठार झाला तर बहीण भक्ती आणि मामा योगेश बेंडाळे हे जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत अजिंठा चौकात उभा असलेला डंपर संतप्त नागरिकांनी पेटवून दिला होता. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. शनिपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक रंगनाथ धारबळे आणि त्यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तसंच अग्निशमन दलाला देखील बोलवण्यात आलं आणि ही आग विझवण्यात आली. यावेळी संतप्त नागरिकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठिमार करावा लागला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!