मुंबई ( वास्तव पोस्ट ) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत केलेल्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. संविधानामुळेच अमित शाह हे गृहमंत्री झाल्याचा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.”भाजपा पक्ष आणि उर्मट नेते हे महापुरुषांचा अपमान करत आहेत. अमित शाहांकडून बाबासाहेबांचा हिणकस आणि उद्दाम प्रकारे उल्लेख करण्यात आला.
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, “अमित शहा संसदेत ज्या पद्धतीने बोलले, त्यावरून त्यांनी त्यांचा उद्धटपणा दाखवला. भाजप आणि आरएसएस अमित शाह यांच्यावर कारवाई करतील की त्यांनी अमित शाह यांना पाठिंबा दिला आहे, चंद्राबाबू नायडू असोत की नितीश कुमार असोत की अजित पवार यांना हे मान्य आहे का? यानंतरही रामदास आठवले त्यांच्या मंत्रिमंडळात राहतील का?
ते पुढे म्हणतात, “…पंतप्रधान त्यांच्याविरुद्ध कारवाई करतील की पंतप्रधानांनी त्यांना असे म्हणण्यास सांगितले होते? हे अमित शाह यांचे वैयक्तिक मत होते की त्यांनी त्यांना तसे सांगण्यास सांगितले होते हे आरएसएसने स्पष्ट करावे…” असेही प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केले.
शिवसेनेचे (यूबीटी) आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, “भाजपाच्या मनातील विष बाहेर आले आहे. त्यांना संविधानाचा अपमान करायचाच होता. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करायचा होता. आता भाजपासोबत असलेल्या पक्षाचे आमदार राजीनामा देणार आहेत का?”.
आंबेडकर ही आमची अंतरात्म्याची आवाज-राष्ट्रवादीचे (एसपी) आमदार जितेंद्र आव्हाड विधिमंडळाबाहेर माध्यमांशी बोलताना म्हणाले,
“आंबेडकर हे फॅशन नाही पॅशन आहे. कुणी फॅशन म्हटले असले तर त्यांना आंबेडकर कळालेच नाहीत. आंबेडकर ही आमची अंतरात्म्याची आवाज आहे. संविधान आले नसते तर मनुस्मृती आली असती. स्त्रीयांना जगता आले नसते. त्या बापाचे नाव घेतल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही. नाव न घेतल्यास पुढची पिढी आम्हाला नाव ठेवेल. आम्हाला नोकऱ्या आणि शिक्षण बाबासाहेबांमुळे मिळाले”. असेही आव्हाड म्हणाले.
काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील शाह यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून माफ़ी आणि राजीनाम्याची मागणी केली आहे.
पश्चिम बंगाल मध्ये देखील मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येत अमित शाह यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. याठिकाणी पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक देखील केली.
