Home » राष्ट्रीय » ‘पुष्पा-२’ चित्रपटाचा अभिनेता अल्लू अर्जुन यास अटक !

‘पुष्पा-२’ चित्रपटाचा अभिनेता अल्लू अर्जुन यास अटक !

हैद्राबाद ( वास्तव पोस्ट ) : पुष्पा-2 अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक का केली? तेही अशा वेळी जेव्हा पुष्पा-2 बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात १००० कोटींची कमाई केली आहे. अशा परिस्थितीत अल्लू अर्जुनला अचानक अटक झाल्याने सर्वच चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये अल्लू अर्जुन पोलिसांसोबत जाताना दिसत आहे.

अल्लू अर्जुनची ही अटक दि.४ डिसेंबरच्या घटनेशी संबंधित आहे. दि.४ डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा-2 प्रदर्शित झाला. पुष्पा-2 चित्रपटाच्या प्रीमियरवेळी चेंगराचेंगरी झाली होती. या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. याच संदर्भात अल्लू अर्जुनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. हैदराबाद चेंगराचेंगरी प्रकरणातच पोलिसांनी कारवाई करत अल्लू अर्जुनला अटक केली आहे. अल्लू अर्जुन पोलिसांना न कळवता प्रीमियरला गेला होता, असा पोलिसांचा आरोप आहे.

अल्लू अर्जुनला का अटक करण्यात आली ?
हैदराबाद चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान रेवती नावाच्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे. पुष्पा स्टार अल्लू अर्जुनचेही नाव पोलिस एफआयआरमध्ये आहे. अभिनेता अल्लू अर्जुनला चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दि.५ डिसेंबर रोजी चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०५ आणि ११८ (१) अंतर्गत अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

अल्लू अर्जुनच्या आधी पोलिसांनी थिएटरच्या एका मालकाला, त्याच्या वरिष्ठ व्यवस्थापकाला आणि खालच्या बाल्कनीच्या प्रभारीला अटक केली आहे. अल्लू अर्जुनची अटक अशा वेळी झाली आहे जेव्हा त्याने एफआयआर रद्द करण्यासाठी तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अभिनेता अर्जुनने महिलेच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. तसेच त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. अल्लू अर्जुन प्रीमियरला येणार असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली नव्हती, असा पोलिसांचा आरोप आहे. त्यामुळेच तेथे चोख सुरक्षा व्यवस्था नव्हती.

अटक टाळण्यासाठी अल्लू अर्जुनने उच्च न्यायालयात धाव घेतली. अल्लू अर्जुनने बुधवारी तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली असून हैदराबाद चेंगराचेंगरीप्रकरणी एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी त्याच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यात यावा. अल्लू अर्जुनने एफआयआर रद्द करण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली आहे. याचिका निकाली निघेपर्यंत अटकेसह पुढील सर्व कारवाईला स्थगिती देण्याची विनंती करण्यात आली. या प्रकरणी उच्च न्यायालयात अद्याप सुनावणी झालेली नाही.

दरम्यान दि. ४ डिसेंबरच्या रात्री संध्या थिएटरमध्ये मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे गोंधळ उडाला. अल्लू अर्जुन आल्यानंतर अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत रेवती या ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. यात त्यांचा आठ वर्षांचा मुलगा जखमी झाला. मुलाला रुग्णालयात दाखल केले. अल्लू अर्जुन संगीत दिग्दर्शक देवी श्री प्रसाद यांच्यासोबत या कार्यक्रमात सहभागी झाला होता. दरम्यान, थिएटरचे मुख्य गेट कोसळल्याने चेंगराचेंगरी झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!