जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर जिल्हा उद्योग केंद्रासमोर महामार्गाचा काही मीटर अंतराचा भाग वारंवार खचत असल्याने सगळ्यांसाठीच हा विषय डोकेदुखीचा झाला आहे. या ठिकाणी विविध प्रकारे खड्डे तसेच खचणाऱ्या भागाचे दुरुस्तीचे काम केले गेले. मात्र प्रत्येक वेळी हाती अपयश आले. कारण काही दिवसातच पुन्हा हा मार्ग खचुन तेथे खड्डे तयार होतात. आता नवीन पद्धतीचा वापर केला जाणार असून पुढील दहा ते बारा दिवसात हे काम पूर्ण होणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातून जाणाऱ्या महामार्गावर जणुकाही अपघातांची मालिकाच सुरु सुरु होती. महामार्गावरील मोठ मोठ्ठे खड्डे, तसेच काही ठिकाणी खचलेला भाग, त्यातून उडणारी धूळ, रस्त्यावर विखुरलेली खडी यामुळे अपघातांचे प्रमाण वाढून त्यात अनेकांचे जीवही गेले. प्रशासन मात्र तातडीने कोणतेही उपाययोजना करत नसल्याचे पाहुन जनता रस्त्यावर उतरली. ठेकेदार, खासदार, आमदार यांच्या विरोधी घोषणाबाजी झाली, रस्ता रोके आंदोलन केले गेले, माहामोर्चे काढण्यात आले, यात लोकप्रतिनिधी देखील सहभागी झाले. सदर प्रकरण थेट केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे पर्यंत पोहचले.
जनतेचा आक्रोश पाहून जिल्हाधिकारी, खासदार, आमदार, तसेच महामार्गाशी संबंधित अधिकारी यांच्या स्थानिक पातळीवर बैठका घेवून, महामार्गाच्या दुरुस्तीबाबत सूचना देण्यात आल्या. त्यानुसार महामार्गाच्या पॅच वर्कच्या कामाला तसेच जिल्हा उद्योग केंद्र ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गेट समोरील खचलेल्या महामार्गावर पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले. मात्र दोनच दिवसांत कामाचे दर्जानुसार बारा वाजलेत, आणि पेव्हर ब्लॉकने देखील कामास हात जोडले व महामार्गाची स्थिति आधिपेक्षा अतिशय भयानक झाली होती.

दरम्यान जिल्हा उद्योग केंद्र ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गेट समोरील खचलेल्या महामार्गाचे सध्या दुरुस्तीचे काम सुरु असून याठिकाणी काही मिटरचा महामार्ग गेल्या वर्षी खोदला तसा आता नव्याने खोदुन काढण्यात येत आहे. यावेळी सर्वात खाली सिमेंट कॉन्क्रीटचा थर देण्यात येणार असून, त्यावर वेगवेगळे थर दिली जातील. मुरुम देखील नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारचा वापरला जाईल असे सांगण्यात आले. महामार्गाजवळून नाला गेला आहे आणि ओलाव्यामुळे याठिकाणी रस्ता वारंवार खचत असून यावेळी देण्यात येणाऱ्या सिमेंट कॉन्क्रीट च्या थरामुळे जमीनीखालील ( महामार्गाखाली) ओलाव्यास प्रतिबंध होईल असे इंजीनियर तसेच ठेकेदार यांच्याकडून सांगण्यात आले.
याठिकाणी विचार करण्यासारखी आणि तेवढीच हास्यास्पद गोष्ट म्हणजे खचलेल्या बाजुच्या विरुद्ध बाजूने नाला आहे. तिकडील महामार्गाची बाजू खचत नाही इकडचीच कशी काय खचते. समुद्रातुन जाणारे भूयारी मार्ग, किंवा मोठमोठ्या नद्यांवरील पुल किंवा जवळून जाणारे रस्ते यांना त्याठिकाणी असलेल्या ओलाव्यामुळे हानी का पोहचत नाही ?
सदर काम हे पुढील दहा ते बारा दिवसात पूर्ण होईल असे याठिकाणी उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्याने सांगितले. तसेच महामार्गाच्या या कामासाठी नव्याने कोणत्याही प्रकारची निविदा काढण्यात आलेली नसून महामार्गाचे काम ज्यांना देण्यात आले होते त्यांच्याकडून हे काम देखरेख ( मेंटेनन्स ) प्रकारात करण्यात येत आहे.
