मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर येताना दिसत आहे. सदर खून प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा हात नसल्याचा पोलिसांना संशय आहे. शुभम लोणकर ऊर्फ शुब्बू याने लॉरेन्स बिश्नोई या नावाने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतरच बाबा सिद्दीकी प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव पुढे आले. मात्र, बिश्नोईने या हत्येची सुपारी घेतली नसावी, असा संशय पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
बिश्नोईशी संबंधित कोणत्याही विशिष्ट व्यक्तीने अद्याप याची जबाबदारी घेतली नाही. लॉरेन्स बिश्नोई टोळीने जेव्हा जेव्हा काही केले आहे, तेव्हा त्याच्याशी संबंधित लोकांनी ते उघडपणे स्वीकारले आहे, किंवा सरळ-सरळ नाकारले आहे, असे याआधीचे रेकॉर्ड सांगते. लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातमधील साबरमती तुरुंगात आहे.
आरोपी शुभम लोणकर, शिवकुमार गौतम आणि जीशान अख्तर यांनी स्वत: बाबा सिद्दीकी हत्येची सुपारी घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र सिद्दीकी यांच्या हत्येमागे झोपडपट्टी पुनर्वसनाचा मुद्दा हा देखील कारणीभूत असावा, असाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित काही खास व्यक्ती त्यात लॉरेन्सचा भाऊ अनमोल, त्याचा साथीदार रोहित गोदारा तसेच कॅनडात राहणारा गोल्डी ब्रार यांच्या प्रतिक्रिया अद्याप आलेल्या नाहीत. सिद्दीकी हत्या प्रकरणात या सर्वांनी मौन बाळगले आहे. हे लोक एखाद्या प्रकरणात आपला सहभाग आहे की नाही, याचा दावा करत होते. पण आत्तापर्यंतच्या मौनामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
यावर्षी एप्रिल महिन्यात सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाला तेव्हा अनमोल बिश्नोईने त्याची जबाबदारी घेतली होती. पुढच्या वेळी गोळीबार झाला तर गोळ्यांचे लक्ष्य भिंती आणि घरे नसतील, असेही तो म्हणाला होता. त्याने थेट सलमान खानला धमकी दिली होती. यामुळे पोलीस या प्रकरणी अजूनही विविध शक्यता गृहित धरून तपास करत आहेत.
