ठाणे दि.३ ( प्रतिनिधी )– उल्हासनगर हिललाईन पोलिस स्टेशनमध्ये काल झालेल्या गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाड यांना आज उल्हासनगर कोर्टात हजर केले .व्हीसी द्वारे आरोपींना हजर करण्याची विनंती होती, मात्र कोर्टाकडून ही विनंती फेटाळण्यात आली . उल्हासनगर कोर्टाने गणपत गायकवाडांना ११ दिवसांची पोलिस कोठड़ी सुनावली . काही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून कोर्ट परिसरात पोलिसांचा तगड़ा बंदोबस्त ठेवण्यात आला होता ,तसेच परिसरात सामान्य नागरिकांसाठी बंदी करण्यात आली होती . सुनावणी वेळी प्रसार माध्यमांनाही दूर ठेवण्यात आले होते .
गोळीबाराबाबत विधिमंडळ कार्यालयाला पोलिस विभागाकडून ईमेल पाठविण्यात आला असुन विधानसभा अध्यक्ष सोमवारी गोळीबाराची माहीती घेणार आहेत . गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गोळीबार प्रकरणाची उच्च स्तरीय तपासणी केली जाईल व ACP रँकचे अधिकारी तपास करणार असल्याचे सांगितले .
दरम्यान काल २ फेब्रुवारी रोजी कल्याण डोंबिवली शहरात मोठा राडा झाला होता . भाजप आमदाराने थेट पोलिस ठाण्यातच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये हा गोळीबार केल्याने प्रचंड खळबळ उडाली होती.
शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या थेट गोळीबारात महेश पाटील गंभीर जखमी झाले होते. यानंतर तातडीने त्यांना उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षाकडून आता भाजपवर निशाणा साधला जात आहे. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या राहुल पाटील यांच्यावरही गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले होते.
म्हणून मी गोळीबार केला
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी नंतर घटनेची जबाबदारी घेत आपणच गोळीबार केल्याचे कुबुलही केले. यांनी माझ्या जागेवर जबरदस्तीने कब्जा केला. याचा मला मनस्ताप होता. मला त्यांना जीवे मारायचे नव्हते. “पण, पोलिसांसमोर माझ्यावर जर कुणी हल्ला करत असेल तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी मला हे करणे भाग होते.”, असे गणपत गायकवाड म्हणाले आहेत. तसेच, या प्रकरणी मला कसलाच पश्चाताप नसल्याचेही गायकवाड यांनी म्हटले आहे.
नेमकं काय घडलं?
गेल्या तीन चार दिवसांपासून उल्हासनगर येथे जागेचा वाद सुरू होता. यावरूनच शिंदे गटातील कार्यकर्ते आणि आमदारांमध्ये चांगलाच वाद झाला. उल्हासनगर हद्दीतील द्वारली गावात येथील जागेवर एक भिंत बांधण्यात आली होती. मात्र, ती भिंत शिंदे गटाने पाडली. हा वाद नंतर पोलिस ठाण्यापर्यंत गेला.
