अमरावती ( वास्तव पोस्ट ) : घराच्या जबाबदारीने असंख्य महिला पूर्णवेळ काम करण्यास पुढे येत नाहीत. या महिलांच्या श्रमशक्तीने उद्योगांना मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे घर सांभाळून आणि शिक्षण घेत असलेल्या मुली-महिलांसाठी अर्धवेळ काम करण्याची योजना आखण्यात येत आहे. लवकरच यास मुर्त रूप येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
सायन्स स्कोर मैदानावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, महिला सशक्तीकरण योजना व महिलांच्या संबंधी इतर योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला मेळावा पार पडला. यावेळी आमदार रवी राणा, प्रविण पोटे पाटील, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. उमेश टेकाळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. कैलास घोडके, जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, निवेदिता चौधरी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, राज्याला राजमाता माँ जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. या महिलांनी राज्याला दिशा देण्याचे काम केले आहे. महिलांचा विकास हा शासनाचा अग्रकम आहे. त्यासाठी शासन महिलांसाठी विविध योजना राबवित आहे. या योजनांची माहिती महिलांना माहिती व्हावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते. अनेकांनी याठिकाणी भेट देऊन योजनांची माहिती घेतली .
