Home » महाराष्ट्र » भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी देशातील २० नद्या एकमेकांशी जोडणार : केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील

भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी देशातील २० नद्या एकमेकांशी जोडणार : केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील

पुणे ( वास्तव पोस्ट ) : प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार ‘हर घर जल’ योजना राबवित आहे. पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमीनीत मुरवणे आवश्यक आहे. भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करावा. देशातील लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी, यासाठी पुढील दोन महिन्यात देशातील २० नद्या एकमेकांशी जोडण्यात येणार, असे प्रतिपादन केंद्रीय जलसंसाधन मंत्री सी. आर. पाटील यांनी केले. गणेश कला क्रीडा मंच येथे नाम फाउंडेशनच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

केंद्रीय मंत्री पाटील म्हणाले की, ‘हर घर जल’ योजनेमुळे महिलांची पाण्यासाठीची भटकंती थांबली. देशातील महिलांचे दररोजचे साडेपाच कोटी तास वाचले आहेत. त्या वेळेचा उपयोग आर्थिक स्वावलंबनासाठी होऊ लागला आहे. शुद्ध पाणी घरी आल्यामुळे जलजन्य आजार कमी होऊन औषधावरील खर्च कमी झाला. भविष्यात देशातील लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी पुढील दोन महिन्यात देशातील २० नद्या एकमेकांशी जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला पर्याप्त पाणी उपलब्ध होऊ शकेल. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, सुरतच्या आमदार संगीता पाटील, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, संस्थापक मकरंद अनासपुरे उपस्थित होते.

जलयुक्त शिवार योजना यशस्वी करण्यामध्ये ‘नाम‘ फाउंडेशनचा मोठा वाटा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाम फाउंडेशनने राज्यातील सर्वाधिक दुष्काळी भागात परिवर्तन घडवून आणले. जलयुक्त शिवार योजना यशस्वी करण्यामध्ये नाम फाउंडेशनचा मोठा वाटा आहे. देशातील सर्वांत जास्त मोठी धरणे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील ५५ टक्के भाग अवर्षणप्रवण आहे. महाराष्ट्रातील पाणी समस्येवरील उपाय शोधण्यासाठी जलयुक्त शिवार कार्यक्रमाची शासनाने आखणी केली. या कार्यक्रमाला नाम फाऊंडेशनने लोकचळवळीत रुपांतरीत केले.ननाम फाउंडेशनने एक हजार पेक्षा जास्त गावांमध्ये वेगवेगळी कामे केली. दुष्काळी भागातील जलसंधारणाची कामे, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण, मुलींचे लग्न, महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम त्यांनी केले.

नाम फाऊंडेशनचे काम भविष्यातील कार्याला उर्जा देणारे : उद्योगमंत्री उदय सामंत
नाम फाऊंडेशनचे कार्य अत्यंत प्रामाणिक आणि पारदर्शी असून कौतुकास्पद आहे. सामाजिक कार्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान असून त्यांचे काम भविष्यातील कार्याला उर्जा देणारे आहे, असे गौदवोद्गार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काढले. यावेळी मंत्री सामंत यांच्या हस्ते नाम फाऊंडेशनचे विश्वस्त, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, एनडीआरएफच्या जवानांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला सीआरपीएफचे पोलीस उपमहानिरीक्षक निंबाळकर, नाम फाऊंडेशचे सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!