Home » महाराष्ट्र » नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या नावासाठी प्रयत्न करणार :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या नावासाठी प्रयत्न करणार :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पुणे ( वास्तव पोस्ट ) : पुण्यातील नवीन विमानतळाचे काम चांगले झाले असून या नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कमिन्स महाविद्यालय, कर्वेनगर येथे आयोजित जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, आमदार उमा खापरे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, प्राधिकरणाचे मुख्य प्रबंधक अंशुमाली श्रीवास्तव, प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपला इतिहास, संस्कृती आणि वारसा यादृष्टीने महाराष्ट्राचे एक वेगळेपण असून संत महापुरुषांच्या ग्रंथानी, ओव्यांनी आपले जीवन समृद्ध आणि संपन्न केले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग हे भक्तीमार्ग असून या मार्गाने लाखो वारकरी पायी जातात. वारकऱ्यांच्या सुविधेच्या अनुषंगाने दोन्ही पालखी मार्गाकरीता सुमारे १२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या मार्गावर संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, विठ्ठल यांच्या प्रतिकृती, विजेची व्यवस्था, वृक्षाची पुर्नलागवड तसेच सुमारे ४२ हजार नवीन झाडे लावण्यात आली आहेत.

वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा देण्याचा प्रयत्न : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात वारीचे महत्त्व मोठे आहे. देहू, आळंदी आणि पंढरपूर या तीर्थक्षेत्राकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते..विठ्ठलाच्या दर्शनाकरीता वर्षांनुवर्षे, शतकानुशतके अडचणीचा सामना करुन वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आशेने पंढरपूरकडे मार्गक्रमण करीत असतात. वारीत पोहचू न शकणारे भाविक आपआपल्या देशातून दर्शनाचा लाभ घेतात, त्यामुळे आपली वारी आता वैश्विक झाली आहे. वारकऱ्यांना योग्य प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजे, रस्ते रुंद झाले पाहिजे, पालखी मार्ग वेगळा करुन त्या मार्गावर सर्व प्रकारच्या सोई असल्या पाहिजे यादृष्टीने काम होत आहे. वारकऱ्यांना पालखी तळावरही विविध सोई-सुविधा देण्याकरीता त्याठिकाणी भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्यात आली असून त्यानंतर केंद्र सरकारच्या मदतीने कामे करण्यात येईल. येत्या काळात वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग क्रमांक ९६५ अंतर्गत दिवेघाट ते हडपसर या पॅकेज ६ च्या कामाचे चौपदरीकरण करण्यात येणार असून या प्रकल्पाची एकूण लांबी १३.२५ किलोमीटर इतकी असून त्याची किंमत ८१९ कोटी रुपये असणार आहे. तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील मुळा व मुठा नदीवरील पुलांचे बांधकाम तसेच सिंहगड रस्ता ते वारजेपर्यंतच्या सेवा रस्त्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे, या प्रकल्पाची एकूण किंमत ८० कोटी रुपये इतकी असणार आहे, या कामांचे कळ दाबून आभासीपद्धतीने भूमीपूजन करण्यात आले.

यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे, विठ्ठल-रूक्मिणी मंदिर पंढरपूर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!