Home » जळगाव » महामार्ग : जळगावकरांच्या डोळ्यात होणारी ही धूळफेक थांबणार कधी ?

महामार्ग : जळगावकरांच्या डोळ्यात होणारी ही धूळफेक थांबणार कधी ?

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीच्या समस्यां बाबत ‘वास्तव पोस्ट‘ कडून सध्या पाहणी केली जात आहे. अनेक समस्यांपैकी एक समस्या म्हणजे रस्ता ही होय. गेल्या तीन दिवसांत शासकीय तंत्रनिकेत महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा समोरील ज्या प्रकारे महामार्गाच्या काही मिटरच्या खचलेल्या भाग आणि त्याठिकाणचे धुळीच्या लोट’चे जे विदारक दृश्य आहे ते बघता प्रशासन आपल्या कामाच्या बाबतीत किती तत्पर किंवा दक्ष आहे याची कल्पना आली.

संबंधित विभाग, प्रशासन, कर्मचारी यांना माहिती आहे की पायाच कच्चा आहे, तरी देखील दुर्लक्ष केले गेले. सुरुवातीला छोटे खड्डे (पॅचेस) तयार झाले, त्यात पावसाचे पाणी मुरले त्यामुळे खड्ड्यांची संख्या वाढली. खुप आधी याचे खापर मनपावर फोडले गेले. महामार्गावरील पथदिवे लावण्याकरीता दुभाजक फोडले आणि त्यात पोल उभारले व त्यातून पाणी मुरले, असे कारण सर्वात आधी समोर आले होते. मात्र त्यानंतर खऱ्या कारणाची अनेकदा टोलवा-टोलवी होत गेली.

पुढे काही दिवसांनी शहरातून जाणाऱ्या या संपूर्ण महामार्गाची ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली. दोन वर्षांपूर्वी दादावाडी थांब्यावर एका खड्ड्याने घेतलेले भयंकर रूप बघता त्या खड्डयाला नागरिकांकडून त्यावेळी ‘सर्वोत्कृष्ट खड्डा‘ पुरस्कार देखील देण्यात आला होता. आज रोजी हा खड्डा देखील आपले पूर्वरूप धारण करत चालला आहे. वाहनचालकांचे लक्ष असले तर ते खड्डा चूकवुन गाडी पुढे नेतात. पायी चालणारे सहज पाऊल टाकून पुढे जातात. मात्र जेव्हा तो खड्डा चुकवतांना चालक गाडीसह मागेपुढे कोणाला धडकेल किंवा त्या खड्ड्यावरुन लांब उडी मारणे कठीण होईल तेव्हा कदाचित त्याचे काम हाती घेतले जाईल.

खरेतर राष्ट्रीय महामार्गाची समस्या किंवा दुरुस्तीची कामे अगदी युद्ध पातळीवर होणे अपेक्षितच नव्हे तर गरजेचे आहे. मात्र या ठिकाणी तर असा प्रकार आहे की, जो पर्यंत रस्त्याची चाळणी होतं नाही, ‘रस्त्यात खड्डे’ ऐवजी ‘खड्ड्यात रस्ता‘ जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याकडे लक्ष दिलेच जात नाही. काम सुरु झाल्यावरही कामाचा दर्जा हा ढासाळलेला असतो. दर्जाहीन कामा मागचे नेमके कारण काय याबाबत ‘वास्तव पोस्ट‘च्या हाती काही माहिती लागली असुन थोड्याच दिवसात त्यावर सविस्तर प्रकाश टाकण्यात येईल.

असो, दर्जाहीन बद्दल थोडक्यात : एक ग्लास नींबू सरबतसाठी एकच नींबू एका व्यक्तीस पुरेसा आहे. अचानक दूसरा व्यक्ति आला तर पाण्याचे प्रमाण वाढवावे लागते, कारण नींबू एकच आहे. आणि जर तीन चार व्यक्तीस सरबत द्यायचे आहे… तर ? तर… त्या एका नींबूने देखील काम चालून जाईल. मात्र या वाटा’घाटीमुळे त्या सरबतला जी चव १००% येणार होती, त्यास आता अजिबात चव किंवा क़्वालिटी, गुणवत्ता मिळणार नाही, कारण त्यात वापरल्या गेलेल्या मटेरियल (नींबू, साखर, मीठ,पाणी आदी) च्या प्रमाणात ताळमेळ न बसणे होय…

(क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!