Headlines
Home » होम » धक्कादायक : महामार्ग पुन्हा खचला ! आतातरी पैसा खड्डयात न टाकता गुणवत्ता राखून रस्त्याच्या कामात टाका

धक्कादायक : महामार्ग पुन्हा खचला ! आतातरी पैसा खड्डयात न टाकता गुणवत्ता राखून रस्त्याच्या कामात टाका

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर प्रवास करणे अतिशय धोक्याचे झाले असुन जळगाव शहरवासी अक्षरशः आपल्या हातात गाडीची मुठ पकडावी की आपला जीव आपल्या मुठीत पकडावा अशा द्विधा मनस्थितित प्रवास करत आहेत. दररोज लहान मोठे अपघात होत आहेत, काहीवेळा थोड्यावर निभावते तर काहीवेळा जीवाशी जात असतांना देखील शहरातून जाणाऱ्या या महामार्गावर बऱ्याच ठिकाणी असलेले मोठ मोठे खड्डे शासन प्रशासनास दिसून न दिसल्या सारखे करत आहेत.

गेल्या काही महिन्यांपूर्वी शासकीय तंत्रनिकेतन समोरील काही मिटरचा रस्ता वारंवार खचत असल्याने लाखों रुपये खर्च करून २०० मिटरचा महामार्ग जवळजवळ चार पाच फुट खोदून नव्याने तयार केला होता. मात्र ९ महिन्यातच परिस्थिति होती त्यापेक्षाही भयानक झाली आहे. याठिकाणी सुमारे ५ ते ६ मिटर अंतराचा महामार्ग खचला असुन काही भाग अक्षरशः अर्धा फुटापेक्षाही जास्त खचला आहे, आणि जवळजवळ तेवढाच भाग रस्ता सपाटीपासून वर आला आहे.

सदर स्पॉटवर वास्तव पोस्ट ने प्रत्यक्ष पाहणी केली असता त्या खचलेल्या ठिकाणी ट्रकच्या चाकाचा पूर्ण भाग त्यात जाऊन ट्रकचालक कसाबसा ट्रक सावरत तो काही मिटरचा रस्ता पार करत आहे. कारचालकास अंदाज न आल्यास चाक वेगाने खचलेल्या भागात जाऊन कारच्या खालील भागास जोरात दणका बसल्याचा आवाज येतो, त्यात कारचे नुकसान होते आणि चालकाची तारांबळ उडताना दिसून आली आहे.

तर दुचाकी स्वार कोणता खड्डा चुकवू या विचारातच स्वतःला सावरत मार्गक्रमण करत आहे. सध्या पाऊस बंद आहे त्यामुळे या भल्या मोठ्या खचलेल्या भागात पाणी साचलेले नाही.

जर या ठिकाणी लवकरात लवकर दुरुस्ती झाली नाही आणि पाऊस पुन्हा सुरु झाला तर साचलेल्या पाण्यात या खचलेल्या भागाचा अजिबात अंदाज येणार नाही, परिणामी या ठिकाणी दुर्दैवाने मोठा अपघात होण्याची भिती आहे.

दरम्यान कोविड काळात महापालिका हद्दीत राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, गेल्याच वर्षी शिवकॉलनीच्या दिशेने शहरात येतांना शासकीय तंत्रनिकेतनचे मुख्य प्रवेशद्वार ते जिल्हा उद्योग केंद्र या भागातील महामार्गाचा भराव मोठ्या प्रमाणात खचला होता. वेळोवेळी दुरुस्ती (पॅचवर्क) करण्यात आल्यानंतरही पुढील तीन चार दिवसांतच पुन्हा खड्डा तयार झालेला असायचा. विशेष म्हणजे तो पॅच दुरुस्त केला की पुढच्यावेळी वेगळा भाग खचलेला असायचा. दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पिंप्राळ्यातील दौऱ्यावेळी याच ठिकाणच्या एका खड्ड्यात एक मालवाहू वाहनाचे मागील चाक निखळले होते.

वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येविषयी अभ्यासकांच्या मते महामार्गाखालून पाण्याचा प्रवाह असुन त्यावर अवजड वाहनांची वाहतूक यामुळे भराव खचत असल्याचा अंदाज तेव्हा व्यक्त करून ऑक्टोबर २०२३ च्या पहिल्या आठवड्यात याठिकाणी महामार्गाचा २०० मीटर लांबीचा भलामोठा रस्ता खोदला, आणि कामासाठी अंदाजे ४० लाखांचा खर्च होणार असे सांगण्यात आले होते.

त्यावेळी या ठिकाणचे साईट इंजिनियर यांनी दिलेल्या माहितीनुसार सदरील ठिकाणचे डांबरीकरण काढून एक्सकेवेटर, डम्पर व इतर मशिनरीच्या सहाय्याने २०० मीटर बाय ८ मीटर भागात ४ ते ५ फूट खोलीपर्यंतचे खडी, मुरूम व मातीचा संपूर्ण भराव काढून रोलरने सपाटीकरण करुन त्यावर मुरुमाचे ३, जाड खडी व बारीक खडीचा प्रत्येकी १, डांबर व खडीमिश्रित १ थर आणि सर्वांत शेवटी बारीक खडीचा १ थर दिला जाईल व त्यासाठी अंदाजित ४० लाख रुपये खर्च आहे, अशी माहिती दिली होती.

मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम करून, लाखो रुपये खर्च होऊन, महिन्याभरापेक्षा अधिक वेळ घेऊनही काही महिन्याच या ठिकाणी रस्त्याची वाईट अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर धुळीचे लोट पुन्हा दिसून येत आहे. आता यापुढे किती तत्परता दाखवून कोणत्या पद्धतीचा वापर करून हा रस्ता दुरुस्त केला जाईल (?) हे बघणे उस्तुकतेचे ठरणार आहे. शेवटी एवढेच सांगावेसं वाटतं की, पद्धत कोणतीही वापरा मात्र… यापुढे पैसा पुन्हा खड्ड्यात न टाकता गुणवत्ता राखून रस्त्याच्या कामात टाका.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!