Headlines
Home » महाराष्ट्र » प्रत्येक तालुक्यात ‘संविधान भवन’ उभारणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

प्रत्येक तालुक्यात ‘संविधान भवन’ उभारणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

CM EKANATH SHINDE : भारतरत्न डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा आदर व सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी,यासाठी प्रत्येक तालुक्यात ‘संविधान भवन’ उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपतीसंभाजीनगर येथे आयोजित मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळ्यामध्ये केली.

छत्रपती संभाजी नगर ( वास्तव पोस्ट ) : विविध विकास प्रकल्पांना निधी दिल्याबद्दल आंबेडकरी समाज समितीतर्फे येथील टीव्ही सेंटर मैदानावर ‘मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळा’ आयोजीत करण्यात आला होता. अजिंठा लेणी पायथ्याशी जागतिक दर्जाचे बुद्धविहार विपश्यना केंद्र उभारणी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी ५० कोटी रुपये, भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्गीकरणासाठी ५ कोटी रुपये, टीव्ही सेंटर येथे छत्रपती संभाजी महाराज पुतळा व अशोक स्तंभ उभारणीसाठी ५ कोटी रुपये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयासाठी २५ कोटी रुपये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर डिजिटल प्रोजेक्टसाठी २५ कोटी रुपये, तारांगणासाठी १० कोटी तसेच मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेमार्फत बेरोजगारांना मदत या प्रकल्पांना निधी देण्यात आला.

सदर सोहळ्यास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आ. प्रदीप जयस्वाल, आ. संजय शिरसाट तसेच संयोजक जालिंदर शेंडगे व सर्व समिती सदस्य उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांना मानपत्र देऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांशी साधला संवाद :
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की आज आपण कृतज्ञता सोहळा आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने माझ्यावर प्रेम व्यक्त करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरातील आंबेडकरी जनतेचे मनापासून आभार मानतो. आपण भाग्यवान आहोत, बाबासाहेबांसारखं मोठं व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रात जन्माला आलं. आपण या महामानवा प्रति कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आज ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मी उभा आहे, या भूमीवर बाबासाहेबांचे पवित्र पाऊल पडले आहे. बाबासाहेबांना या शहराबद्दल विशेष आपुलकी होती, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर आपला देश चालतो. चार दिवसांनी देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन आहे. बाबासाहेबांची घटना होती म्हणूनच आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून जगभर ओळखले जातो. असे सांगून ‘जब तक सूरज चांद रहेगा, बाबासाहेबका संविधान रहेगा’, अशा शब्दात त्यांनी संविधानाबद्दल गौरव व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम खरात यांनी केले. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आ. प्रदीप जयस्वाल, खासदार संदिपान भुमरे यांनीही मनोगत व्यक्त केले. पंचशिला भालेराव यांनी “…शिंदे साहेबांनी आणली लाडकी बहीण योजना” हे गीत सादर केले. सोहळ्यास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रविणा कन्नडकर यांनी सूत्रसंचालन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!