Home » महाराष्ट्र » जालना ते जळगाव दरम्यान नवीन रेल्वे लाईन प्रकल्पास मंत्रिमंडळाची मंजुरी

जालना ते जळगाव दरम्यान नवीन रेल्वे लाईन प्रकल्पास मंत्रिमंडळाची मंजुरी

Jalana to Jalgaon Rail Line : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडी विषयक मंत्रिमंडळ समितीने रेल्वे मंत्रालयाच्या आठ प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. यासाठी एकूण रु. २४६५७ कोटी (अंदाजे) खर्च अपेक्षित आहे. प्रकल्प २०२३-३१ पर्यंत पूर्ण होणार आहे. यात जालना-जळगाव- १७४ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचा समावेश आहे.

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जालना ते जळगाव या बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रेल्वे मार्गाला अखेर मंजुरी मिळाली आहे. खान्देश तसेच मराठवाड्यातील नागरिकांसाठी ही मोठी आणि महत्वाची बातमी आहे. यामुळे मराठवाडा उत्तर महाराष्ट्राला जोडला जाणार आहे. १७४ किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी तब्बल ७ हजार १०५ कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जालना ते जळगाव रेल्वे महामार्गामुळे मराठवाड्यातील दळणवळण गतिमान होणार आहे. त्याचबरोबर अजिंठा आणि वेरुळ या जागतिक दर्जाच्या पर्यटनास्थळांवर पोहचणे देखील सुलभ होणार आहे.

दरम्यान जालना-जळगाव रेल्वेमार्गाचा अनेकवेळा सर्व्हे करण्यात आला होता. त्यामुळे नेमका रेल्वेमार्ग कोणत्या तालुक्यातून जाणार? असा प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांना पडला. प्राप्त माहितीनुसार, रेल्वेमार्ग हा जालना येथून भोकरदन तालुक्यात येईल. तिथे रेल्वेला थांबा देण्यात येईल. त्यानंतर सिल्लोडच्या दिशेने रेल्वेमार्ग वळवण्यात येईल.

सिल्लोडनंतर रेल्वेमार्ग थेट अजिंठा आणि पहूर मार्ग जामनेर तसेच जळगावला जोडला जाईल. अजिंठा लेणी परिसरात देखील या रेल्वेमार्गाला थांबा असेल. प्रकल्पामुळे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक असलेल्या ‘अजिंठा लेणी’, भारतीय रेल्वे नेटवर्कशी जोडल्या जातील. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देणाऱ्या पर्यटकांची सोय होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!