Home » क्रीडा » ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी टीम ने रचला इतिहास ; स्पेन’ला नमवत कांस्य पदकावर कोरले नाव

ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी टीम ने रचला इतिहास ; स्पेन’ला नमवत कांस्य पदकावर कोरले नाव

🥉OLYMPICS 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा प्रवास शानदार राहीला. पूल-बी मधून भारताने १० गुणांसह दुसरे स्थान मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यानंतर उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा पराभव केल्यानंतर उपांत्य फेरीत भारताला जर्मनीकडून पराभव पत्करावा लागला.

पॅरिस ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भारत आणि स्पेन यांच्यामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकासाठी आज सामना झाला. याआधी उपांत्य फेरीत भारताचा जर्मनीकडून पराभव झाल्याने सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले. त्यामुळे कांस्य पदाकासाठी स्पेन विरोधात लढत द्यावी लागली. भारताचा हॉकी टिमचा कॅप्टन हरमनप्रीत सिंग याने केलेले दोन गोल आणि पीआर श्रीजेशचा भक्कम बचाव या जोरावर भारताने आज कांस्य पदकावर आपले नाव कोरले. पीआर श्रीजेशच्या कारकिर्दीचा हा अखेरचा सामना ठरला.

दरम्यान भारत आणि स्पेन यांच्यातील कांस्य पदकाची लढत अतिशय रोमांचक झाली. भारत आणि स्पेन यांनी पहिल्या क्वार्टरमध्ये जोरदार खेळ केला. यामुळे दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. भारताविरुद्ध दुसऱ्या क्वार्टरमध्ये स्पेनने पेनल्टी स्ट्रोकचा लाभ उठवत गोलं केला. स्पेनसाठी हा गोल मार्क मिरालेसने केला.

स्पेनने १-० आघाडी घेतल्यानंतर भारताने मात्र जोरदार कमबॅक केले. भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत १-१ अशी बरोबरी केली. पहिला हाफ संपेपर्यंत भारतीय संघाने आक्रमक खेळ करत मॅचमध्ये बरोबरी साधली.

भारतासाठी दोन्ही गोल हरमनप्रीत सिंग याने केले. पहिला गोल ३० व्या मिनिटाला तर दूसरा गोल ३३ व्या मिनिटाला केला. यामुळे भारताने मॅचमध्ये २-१ अशी आघाडी घेतली. भारताने यापूर्वी स्पेन विरुद्ध झालेले दोन्ही सामने जिंकले होते. भारताने गेल्यावेळी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीला पराभूत करत कांस्य पदकावर नाव कोरले होते.

गोलकीपर पीआर श्रीजेश याचा अखेरचा सामना
ऑलिम्पिक सुरु होण्यापूर्वी ही स्पर्धा आपल्यासाठी शेवटची असल्याचे भारताचा गोलकीपर पीआर श्रीजेश याने जाहीर केले होते. भारतीय संघाचा पीआर श्रीजेशला सुवर्णपदकाच्या विजयासह निरोप देण्याचा प्रयत्न होता. मात्र, जर्मनीविरुद्ध पराभव झाल्यानंतर कांस्य पदकाची लढत भारताला स्पेन विरुद्ध लढावी लागली. पीआर श्रीजेश याने कांस्य पदकाच्या लढतीपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या भावना मांडल्या होत्या.

पीआर श्रीजेशने म्हटले की, मी आज गोलपोस्ट समोर शेवटचा उभा राहणार आहे. माझे मन अभिमान आणि आभाराने भारावून गेलेले आहे. एका छोट्या मुलापासून भारताच्या सन्मानाचे रक्षण करणारा व्यक्ती हा प्रवास असाधारण होता. आज भारतासाठी शेवटची मॅच खेळत आहे. प्रत्येक वाचवलेला गोल, प्रत्येक डाईव माझ्या मनात असेल. भारताने माझ्यावर विश्वास ठेवला यासाठी आभार, असे पीआर श्रीजेश म्हणाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!