आता ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंपाचा वापर करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार
Free electricity to agricultural pumps : कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर ३९ हजार २४६ द.ल.यू. आहे. मुख्यतः या विजेचा वापर कृषी क्षेत्रात पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो. आता राज्यातील ७.५ एच.पी. पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषि पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे.
मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : “भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे, मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. अशा परिस्थितीत अडचणीत आलेल्या शेतकरी बांधवांना मदतीच्या हात म्हणून आता “मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना” घोषित करण्यात आली आहे.
‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना – २०२४’ अंतर्गत आता ७.५ अश्र्वशक्ती पर्यंतच्या शेतीपंपाचा वापर करणाऱ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाणार आहे. महाराष्ट्र राज्यात मार्च २०२४ अखेर ४७.४१ लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत. सदर ग्राहकांना महावितरण कंपनी मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो. एकूण ग्राहकांपैकी १६ टक्के कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे ३० टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो.
जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर याचा दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत आला असल्याने शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून राज्यातील ७.५ एच.पी पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवले आहे.
सदर योजनेचा कालावधी हा एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ अशा पाच वर्षांसाठी राबविण्यास मान्यता देण्यात आली असून याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक क्र. २०२४०७२५१२५८४०९८१० असा आहे.
