श्रीलंका ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातला पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना पल्लेकेले स्टेडियमवर खेळला गेला. टी-20 चा नवीन कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे. टीम इंडियाने टी-20 मालिकेतील पहिला सामना ४३ धावांनी जिंकला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी मिळाल्यावर टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी २१४ धावांचे कठीण लक्ष दिलं होतं.
या २१४ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या सलामी जोडीने ८.४ षटकांत ८४ धावांची जलद भागीदारी करत टीम इंडियाला सळो की पळो करून सोडले. त्यानंतर मात्र टीम इंडियाने गोलंदाजांच्या जोरावर जोरदार मुसंडी मारत श्रीलंकेला १ बाद १४० अशा भक्कम स्थितीतुन १९.२ षटकात मध्ये १७० धावांवरच रोखलं.
श्रीलंकेकडून असिथा फर्नांडोने ३१ आणि वानिंदू हसरंगाने ३१ धावा केल्या. कामिंदू मेंडिसने १० आणि कुसल परेरा ने २० धावांचे योगदान दिले. कर्णधार चरिथ असलंका, दासुन शनाका, डी मदुशनाका यांना खातेही उघडता आले नाही. पथुम निसांकाने ७९ आणि कुशल मेंडिसने ४५ धावा केल्या. रियान पराग याने अतिशय घातक मारा करत केवळ १.२ षटकात फक्त ५ धावांच्या मोबदल्यात श्रीलंकेच्या ३ फलंदाजांना तंबूत पाठवले. याच स्पेल मध्ये भारताच्या विजय निश्चित झाला. टीम इंडियाने या विजयासह ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
दरम्यान त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. टीम इंडियाने २० षटकामध्ये ७ विकेट्स गमावून २१३ धावा केल्या. सूर्याने सर्वाधिक ५८ धावा केल्या. ऋषभ पंतने ४९ धावांचं योगदान दिलं. तर यशस्वी जयस्वाल-शुबमन गिल या दोघांनी अनुक्रमे ४० आणि ३४ धावा केल्या. हार्दिक पंड्याने ९ धावा केल्या. तर अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंह ही जोडी अनुक्रमे १० आणि १ धाव करुन नाबाद परतले.
श्रीलंकेकडून मथीशा पथीराणा याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर वानिंदु हसरंगा, असिथा फर्नांडो आणि दिलशान मधुशंका या त्रिकुटाने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
🏏 भारत विरुद्ध श्रीलंका संक्षिप्त धावफलक :
● भारत २१३/७ (२० षटके )
● श्रीलंका १७०/१० ( १९.२ षटके )
● निकाल : भारत ४३ धावांनी विजयी.
● मालिकेत १ – ० ने आघाडी
