कोल्हापूर ( वास्तव पोस्ट न्यूज ) : कोल्हापूर-बालिंगे-कळे-साळवण ते गगनबावडा या मार्गावरील जुन्या दगडी कमानी पुलाच्या पूराच्या पाण्याची पातळी धोका पातळीपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे बालिंगा पुलावरून वाहतूक आजपासून थांबवण्यात आली आहे. चार चाकी आणि लहान वाहनांना वाहतुकीसाठी हा पूल पूर्णपणे थांबवण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजवरुन जिल्ह्यात पावसाची परिस्थिती लक्षात पाणी-पातळी अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वित्त व जिवित हानी होऊ नये म्हणून बालिंगामधील जुना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्र.२ चे उपअभियंता आर.बी.शिंदे यांनी दिली आहे.
पुराच्या पाण्याची पातळी धोका पातळीपासून खाली पोहोचेपर्यंत या पुलावरुन वाहतुक बंद करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा जसे की रुग्णवाहिका, दुधाच्या गाड्या, भाजीपाला यांची वाहतुक सुरु राहील.
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंगा येथे १३८ वर्षाचा ब्रिटिश कालीन दगडी पूल आहे. स्थानिक नागरिक व या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही शिंदे यांनी केले आहे.
