जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव महानगर पालिकेचे माजी उप महापौर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुलभुषण पाटील यांनी आज दि.२४ रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. तसेच येणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्यात.
दरम्यान कुलभूषण पाटील यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या छत्री आणि टी-शर्ट चे अनावरण शिवसेना नेते तथा माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर करण्यात आले. उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने माजी उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्या तर्फे जळगाव शहरात दहा हजार छत्री व टी शर्टचे वाटप करण्यात येणार आहे. छत्री व टी शर्टवर बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे, अदित्य ठाकरे व कुलभुषण पाटील यांचे फोटो व मशालीचे चिन्ह आहे.

यावेळी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी कुलभुषण पाटील यांच्या या उपक्रमाचे कौतूक करत पुढील राजकीय वाटचालीसाठी आर्शिवाद दिले. छत्री, टी-शर्ट आणि पक्षाचे मशाल हे चिन्ह घराघरात पोहचविण्यासाठी या उपक्रमाचा फायदा होईल, तसेच बाळासाहेबांची २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण ही शिकवण लक्षात ठेवून सामाजिक काम करत रहा. नागरिकांच्या मनात मशालच आहे, याची प्रचिती लोकसभा निवडणुकीत आलीच आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत यश आपलेच आहे असा विश्वास उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला.

कुलभूषण पाटील हे जळगाव शहरातील शिवसेनेचा युवा तडफदार आक्रमक चेहरा आहे. पिंप्राळा येथे त्यांनी अनेक अडथळ्यांमधुन मार्ग काढत उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचे भूमिपूजन आणि उद्घाटनावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आले होते. कुलभूषण पाटील हे उपमहापौर असतांना त्यांनी केलेल्या कामांमुळे शहरातील अबाल वृद्धांमध्ये त्यांची चांगलीच ओळख निर्माण झाली आहे. आपल्या उपमहापौर पदाच्या कार्यकाळात त्यांनी शहर तसेच उपनगरात नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणावर मूलभूत सुविधा दिल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत जळगाव शहर विधानसभा मतदार संघाच्या शर्यतीत उमेदवार म्हणून कुलभूषण पाटील यांचेही नाव चर्चेत आहे.
