UPSC Chairman Resigned : केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी राजीनामा दिला आहे. सोनी गेल्या वर्षी यूपीएससीचे अध्यक्ष झाले होते. प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरचा वाद सुरु असुन आपला कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच सोनी यांनी राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.
नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोनी यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांचा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही. सोनी २०१७ मध्ये UPSC सदस्य म्हणून रुजू झाले. गेल्या वर्षी मे महिन्यात ते यूपीएससीचे अध्यक्ष झाले. प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर वाद चर्चेत असतानाच त्यांनी UPSC चेअरमन पदाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान मनोज सोनी यांनी १६ मे २०२३ रोजी UPSC अध्यक्ष म्हणून शपथ घेतली होती, आणि त्यांचा कार्यकाळ १५ मे २०२९ रोजी संपणार होता. मनोज सोनी हे वयाच्या ४० व्या वर्षी वडोदरा येथील प्रसिद्ध एमएस विद्यापीठाचे कुलगुरू बनले. देशातील सर्वात तरुण कुलगुरू बनण्याचा त्यांना मान मिळाला.
१ ऑगस्ट २००९ ते ३१ जुलै २०१५ पर्यंत गुजरातच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सलग दोन वेळा आणि २००५ ते एप्रिल २००८ मध्ये बडोदाच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून एक वेळा त्यांनी काम केले. अशाप्रकारे दोन विद्यापीठांमध्ये ते तीनवेळा कुलगुरू राहिले आहेत. सोनी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय मानले जातात.
सध्या देशभरात वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरच्या प्रकरणावरून मोठा गदारोळ सुरू आहे, प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर हिने कागदपत्रांमध्ये तिचे नाव, पालकांचे नाव, स्वाक्षरी, ईमेल, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून तिची बनावट ओळख निर्माण केली. अशाप्रकारे खोटेपणा केल्याच्या आरोपांनी पूजा खेडकर यांना घेरले आहे.
पूजा खेडकर यांच्यावर एफआयआर दाखल होऊन तपास सुरु आहे. या वादातच यूपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून मनोज सोनी यांच्या राजीनाम्याने अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र सोनी यांचा राजीनामा आणि पूजा खेडकर प्रकरणाचा काहीही संबंध नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी यांना सामाजिक धार्मिक कामांवर अधिक वेळ घालवायचा आहे. राजीनाम्यानंतर सोनी यांना आपला वेळ गुजरातमधील स्वामिनारायण पंथाची शाखा असलेल्या अनुपम मिशनसाठी घालवायचा आहे.
