जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव येथे आयोजित सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात पोद्दार स्कूल संघाने तिहेरी मुकुट पटकावला. तर रायसोनी इंग्लिश मीडियम स्कूल व ओरियन स्कूल या संघाने उपविजेतेपद संपादन केले. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे महानगरपालिका स्तरीय आंतरशालेय सुब्रतो चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आले होते. मनपा स्तरीय स्पर्धेत १७ वर्षांखालील वयोगटात मुलींमध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल संघाने विजेतेपद तर रायसोनी इंग्लिश मीडियम स्कूल संघाने उपविजेतेपद पटकाविले.

मुलांमध्ये पोद्दार स्कूल संघ अजिंक्य ठरला तर ओरियन सीबीएससी हा संघ उपविजेता ठरला. तत्पूर्वी, १५ वयोगटात सुद्धा पोद्दार स्कूल संघ विजयी ठरल्याने तिन्ही गटात पोद्दार स्कूलच्या संघाने अजिंक्यपद प्राप्त करत तिहेरी मुकुट प्राप्त केला. या स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन व स्पोर्ट हाऊसतर्फे सुवर्ण व रौप्य पदक प्रमुख अतिथींच्या हस्ते देण्यात आले.

🏆 पारितोषिक वितरण समारंभ :
पारितोषिक वितरण कार्यक्रमास जळगाव शहरातील नामवंत डॉ. मंधार पंडित, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आयशा खान व सामाजिक कार्यकर्त्या निवेदिता ताठे, जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख, कार्याध्यक्ष डॉ. अनिता कोल्हे, अब्दुल मोहसीन, ॲड. आमीर शेख, अन्वर खान, मतीन पटेल, फारूक काद्री यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना पारितोषिक देण्यात आली.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मॅच कमिशनर अब्दुल मोहसीन, स्पर्धा प्रमुख पंच वसीम शेख व राहील शेख यांच्यासह हिमाली बोरोले, रोहिणी सोनवणे, इम्रान बिस्मिल्ला, सादिक अली, अझान पटेल, अनस शेख, आदिल शाह, मतीन शाह, सैफ शेख, धनंजय धनगर, दीपक सस्ते, रेहान शेख, सुफियान तेली, शेखर तडवी आदींचा प्रमुख अतिथींच्या हस्ते गौरव करण्यात आला. स्पर्धेची समारोप प्रास्ताविक फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा पाटील यांनी केले. डॉ.अनिता कोल्हे यांनी आभार मानले.
