Home » महाराष्ट्र » मद्यपी वाहनचालक तसेच नियम भंग करणाऱ्या पब्ज, बारवर कडक कारवाई करण्याच्या सूचना

मद्यपी वाहनचालक तसेच नियम भंग करणाऱ्या पब्ज, बारवर कडक कारवाई करण्याच्या सूचना

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : सध्या महाराष्ट्रात अपघातांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यातील बऱ्याच प्रकरणात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ हे मुख्य कारण समोर येत आहे. यामुळेच आता मुंबईतील ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ ची प्रकरणे रोखण्यासाठी रस्ते, चौक, वर्दळीची प्रमुख ठिकाणे यासह नाक्या-नाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करून कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत.

त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब्ज आणि बारवरही कठोर कारवाई करण्याची सूचना मुंबई महापालिकेसह पोलीस प्रशासनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलीस आणि मुंबई प्रशासनास दिलेले निर्देश
● विशेषत: रात्रीच्या वेळेस तसेच विकेंडच्या दिवशी तपासण्यांचे प्रमाण वाढविण्यात यावे.

● मद्य सेवन करुन वाहने चालविणाऱ्या चालकांवर कडक कारवाई आणि दंडाची वसुली करण्यात यावी.

● नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर (Repeat offenders) कडक कारवाई करण्यात यावी. अशा वाहनचालकांचे लायसन्स रद्द करण्यात यावे.

● मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाने शहरातील पब्ज, बार आणि रेस्टॉरंट्सची नियमित तपासणी करावी.

● पब्ज, बार, रेस्टॉरंट चालू ठेवण्याच्या वेळा, ध्वनीप्रदूषण रोखण्याचे नियम, आवश्यक परवाने यासंदर्भात वेळोवेळी तपासण्या करण्यात याव्यात.

● रात्री उशिरा सुरु राहणारे बार, पब्ज आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात यावी, त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत.

● महापालिका आणि पोलीस प्रशासनाने यासाठी समन्वयाने काम करावे.

● मद्यसेवन करुन वाहने चालविण्याच्या होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात यावी.

● जनतेची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन होण्याच्या अनुषंगाने सर्व संबंधीत प्रशासकीय यंत्रणांनी कडक कारवाई करावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!