ZIM vs IND T20I : झिम्बाब्वेने भारताला विजयासाठी ११६ धावांचे माफक आव्हान देऊन, प्रत्युतरात भारतास १०२ धावांवर गुंडाळत विद्यमान विश्वविजेत्या संघाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-२० सामना १३ धावांनी जिंकला.
झिम्बाब्वे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली. पहिला सामना शनिवारी दुपारी साडेचार वाजल्यापासून हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला गेला. या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेने भारताचा १३ धावांनी धक्कादायक पराभव केला. भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ९बाद ११५ धावा करत भारतासमोर ११६ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
टीम इंडिया हे आव्हान सहज पार करेल असे वाटतं होते. मात्र प्रत्युत्तरात भारतीय संघाला १९.५ षटकांत केवळ १०२ धावांवर गड़गडला. या विजयासह झिम्बाब्वेने मालिकेत १-०अशी आघाडी घेतली आहे. गिल आणि सुंदर यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.अभिषेक शर्मा तर खाते न उघडताच बाद झाला. तसेच रियान पराग आणि ध्रुव जुरेलही काही विशेष कामगिरी करू शकले नाहीत. या तीन खेळाडूंनी आयपीएल २०२४ मध्ये आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. मात्र आज तिघेही सपशेल फ्लॉप ठरले.
११६ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही आणि पहिल्याच षटकात संघाने अभिषेक शर्माची विकेट गमावली. अभिषेक चार चेंडूत खाते न उघडता बाद झाला. यानंतर विकेट्सची पडझड सुरूच राहिली.
शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याशिवाय कोणीही चांली फलंदाजी केली नाही. कर्णधार गिलने पहिल्या सामन्यात २९ चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने ३१ धावा केल्या. तर सुंदरने २७ चेंडूत १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २७ धावा केल्या. या सामन्यात गायकवाडने ७, परागने २, रिंकू सिंगने ०, जुरेलने ६, बिश्नोईने ९, आवेशने १६, मुकेशने ० धावा केल्या. तर, खलील खाते न उघडता नाबाद राहिला. झिम्बाब्वेकडून चतारा आणि कर्णधार रझा यांनी प्रत्येकी ३ तर बेनेट, वेलिंग्टन, मुझाराबानी आणि ल्यूक यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
दरम्यान या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर झिम्बाब्वेने पहिल्या डावात फलंदाजी करताना २० षटकांत९ गडी गमावून ११५ धावा केल्या होत्या. ब्रायन बेनेट १५चेंडूत २२धावा करून तर कर्णधार सिकंदर रझा १९ चेंडूत १७ धावा करून बाद झाला. मेयर्सने सर्वाधिक २३ धावांची खेळी केली.
टीम इंडियाकडून रवी बिश्नोईने ४ विकेट घेतल्या. याशिवाय वॉशिंग्टन सुंदरने २, मुकेश कुमार आणि आवेश खानने प्रत्येकी १ विकेट घेतली
