Home » महाराष्ट्र » स्पर्धा परीक्षांबाबत राज्य शासनाचे मोठे निर्णय ; गैरप्रकार रोखण्यासाठी नवीन कायदा करणार !

स्पर्धा परीक्षांबाबत राज्य शासनाचे मोठे निर्णय ; गैरप्रकार रोखण्यासाठी नवीन कायदा करणार !

MPSC EXAM : स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी नवीन कायदा याच अधिवेशनात मांडला जाईल. तसेच वर्ग क ची पदेही एमपीएससी द्वारे भरले जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : ‘नीट’ या सामाईक प्रवेश परीक्षेचा यंदाचा निकाल जाहीर झाल्यानंतर देशभरात सर्वत्र मोठा वाद निर्माण झाला. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमसाठी प्रवेश घेणाऱ्यांसाठी नीट (NEET) ही प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य असते. मात्र यावर्षी नीट परीक्षेत तब्बल ६७ विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले. यानंतर परीक्षार्थींमध्ये सर्वत्र संतापाची लाट उसळली. अशातच आता महाराष्ट्रात MPSC मार्फत लिपिक टंकलेखक पदासाठी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. यामुळे सहाजिकच विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“स्पर्धा परीक्षांमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून राज्य सरकारकडून नवीन कायदा केला जाणार आहे. मुख्यमंत्र्‍यांनी याबद्दलचे निर्देश दिले आहेत. याच अधिवेशनात आम्ही हा कायदा मांडणार आहोत. यामुळे यापुढे सर्व परीक्षांच्या प्रक्रिया या पारदर्शी पद्धतीने होतील”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलतांना दिली.

“वर्ग क ची पदही MPSC द्वारे भरली गेली पाहिजेत, अशी मागणीही केली जात होती. गेल्या कॅबिनेट बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार टप्प्याटप्प्याने वर्ग क ची पदही MPSC वर्ग करण्यात येणार आहेत. त्यानुसार ही सर्व पद एमपीएससीद्वारे भरण्यात येतील”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान MPSC परीक्षांमध्ये उत्पादन शुल्क उपनिरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक, तांत्रिक सहाय्यक आणि उद्योग निरीक्षक या पाच पदांचा समावेश होतो. MPSC मार्फत लिपिक टंकलेखक पदासाठीची कौशल्य चाचणी परीक्षा १ जुलै ते १३ जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा पवईतील ion digital zone या ठिकाणी होणार होती. मात्र १ जुलैला सकाळच्या पहिल्याच सत्रात विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. ही परीक्षा TCS कडून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षांची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशी सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!