NAGPUR DIKSHABHUMI : नागपूरच्या दीक्षाभूमीवर अंडरग्राऊंड पार्किंगचा निर्णय राज्य सरकारनं स्थगित केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लाखो अनुयायांसह याच ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळे दीक्षाभूमीला विशेष महत्त्व आहे.
मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नागपूरच्या दीक्षाभूमीवर अंडरग्राऊंड पार्किंगचा निर्णय राज्य सरकारने अखेर स्थगित केला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली. दीक्षाभूमी येथे विकासाच्या आराखड्यास राज्य सरकारने २०० कोटी रुपयांचा निधि दिला असुन संपूर्ण आराखडा हा स्मारक समितीने सुचविल्याप्रमाणे तयार करण्यात आला आहे. त्यानुसारच भूमिगत पार्किंगचे काम स्मारक समितीमार्फत हाती घेण्यात आले होते.

मात्र लोकभावना लक्षात घेता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एक बैठक घेऊन सर्वांच्या संमतीने निर्णय घेण्यात येईल. सर्वांचे मत विचारूनच त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लाखो अनुयायांसह याच ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळे नागपुर येथील दीक्षाभूमीला विशेष असे महत्त्व आहे. आंबेडकरी समाजाकडून या जागेवर तीन मजली भूमिगत पार्किगच्या मुद्द्याला जोरदार विरोध होऊन त्याचे पडसाद उमटले. या निर्णयाला विरोध करण्यासाठी अनेक आंदोलक दीक्षाभूमीवर जमा झाले होते. त्यांनी लोखंडी ढाचा पाडण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान दीक्षाभूमी, नागपूर येथील कुठलीही पार्किंगची मागणी नसतांना ट्रस्टींनी त्याचा घाट घातला. याविरोधात जनता उतरली आहे. ट्रस्टीनी लोकांच्या भावनेशी खेळू नये. आमचाही या पार्किंगला विरोध आहे. आंदोलनकारी जनतेच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी उभी आहे, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांन जाहीर केले होते.
