NEET Paper Leak Scame : नीट परीक्षा घोटाळ्यात लातूर कनेक्शन समोर आल्यानंतर याप्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक जलील पठाण याला निलंबीत करण्यात आले आहे. तसेच त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
लातूर ( वास्तव पोस्ट न्यूज ) : वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET) घोटाळ्यात लातूर जिल्ह्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला अखेर निलंबीत करण्यात आले आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्याकडे निलंबनाचा प्रस्ताव सादर केला. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. कातपूर येथील शाळेचा मुख्याध्यापक जलील पठाणच्या विरोधात लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नीट घोटाळा प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक जलील पठाण लातूर जिल्ह्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक होता. जलील पठाण आणि संजय जाधव हे दोघे लातुरात नीट पेपरफुटीचं रॅकेट चालवत असल्याचं समोर आले आहे. या दोन्हीं आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या एकूण चौघांवर लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी मुख्याध्यापक जलील पठाणवर लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणामुळे लातूर जिल्हा परिषदेची प्रतिमा मलीन झाली आहे. जलील पठाणचा विभागीय चौकशीसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले.
