IND vs PAK T20 World Cup 2024 : नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमच्या खेळपट्टीवरून वाद निर्माण झाला आहे. येथेच अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव केला होता. मात्र आता चांगली खेळपट्टी देण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन आयसीसीने दिले आहे.
मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : टी-20 विश्वचषक २०२४ चा भारत आणि पाकिस्तान यांच्यातला हा बहुचर्चित हाय वोल्टेज सामना ९ जून रविवारी संध्याकाळी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. याच स्टेडियमवर टीम इंडियाने पहिल्या सामन्यात आयर्लंडचा पराभव केला होता. तर पाकिस्तानला पहिल्या सामन्यात अमेरिकेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता.
दरम्यान, नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमच्या खेळपट्टीवरून वाद निर्माण झाला आहे. मात्र आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या मुद्द्यावर आपले मौन सोडले आहे. गोलंदाजांना मिळणाऱ्या असामान्य उसळी आणि मुव्हमेंटमुळे या मैदानावर फलंदाजी करणे खूप कठीण आहे. पण आता पुढील सामन्यांसाठी चांगली खेळपट्टी देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन आयसीसीने दिले आहे.
याबाबत आयसीसीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममधील खेळपट्टीचे वर्तन आमच्या अपेक्षेप्रमाणे झाले नसल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. हे जागतिक दर्जाचे मैदान विकसित करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. उद्याचा सामना पाहिल्यानंतर परिस्थितीची तपासणी करून पुढील सामन्यांसाठी चांगली खेळपट्टी तयार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
न्यूयॉर्कमधील नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर २०२४ टी-20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत २ सामने खेळले गेले आहेत. या मैदानावरील पहिला सामना दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात झाला होता. त्यात श्रीलंकेचा संघ फक्त ७७ धावांच करु शकला. ही माफक धावसंख्या गाठण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला १७ षटके खेळावी लागली. यानंतर भारत विरुद्ध आयर्लंड सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा आयर्लंडचा संघ ९६ धावात बाद झाला होता. विजयासाठी ९७ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियालाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.
