Home » महाराष्ट्र » दरमहा ७० ते ८० लाख हफ्ता घेतांना लाज वाटत नाही का ? रविंद्र धंगेकर यांचे गंभीर आरोप !

दरमहा ७० ते ८० लाख हफ्ता घेतांना लाज वाटत नाही का ? रविंद्र धंगेकर यांचे गंभीर आरोप !

पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर पुण्यात पहाटेपर्यंत चालू असणारे पब आणि बार कोणाच्या आशीवार्दाने चालतात, हा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. याबाबत रविंद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे.

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात मद्यधुंद अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने कार चालवत दोन जणांचा बळी घेतला. त्यानंतर शहरात अवैधरित्या चालणारे पब आणि ड्रग्जच्या मुद्द्यावरुन रान उठवणारे काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी पुण्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर कार्यकर्त्यांसह धडक दिली. या दोघांनी उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना अक्षरश: धारेवर धरले.

यावेळी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तुमचे सर्व आरोप साफ चुकीचे आहेत, असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आमदार रविंद्र धंगेकर यांनी मात्र त्यांना फैलावर घेतले. तुम्ही खोटं बोलू नका, तुम्ही पापं करताय, तुम्हाला लय समजतं का, तुम्ही दर महिन्याला ७० ते ८० लाख हप्ता घेता, याची यादी माझ्याकडे. ही यादी रविंद्र धंगेकर यांनी आपल्या “X” या सोशल प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केली आहे.

तुम्हाला कोण कोण लोक पैसे आणून देता, याची माहिती माझ्याकडे आहे. तुम्ही स्वत:ला शहाणे समजता का, तुम्ही पुणे उदध्वस्त केलं, तुम्हाला लाज कशी वाटत नाही?, अशा एका पाठोपाठ एक प्रश्नांचा भडीमार रविंद्र धंगेकर यांनी केला.

यावेळी रविंद्र धंगेकर यांनी हप्ते घेणार्‍या पोलिसांची नावे वाचून दाखवली. हे सर्व तुमच्याच आशीवार्दाने हप्ते घेतात. जर पुणे महानगरपालिकेची परवानगी नसेल तर पुण्यातील पब सकाळी चार वाजेपर्यंत कसे चालतात? आम्ही याचा जाब विचारण्यासाठी याठिकाणी आलेलो आहोत, असे रविंद्र धंगेकर यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावले.

दरम्यान रविंद्र धंगेकर म्हणाले की, आम्ही आता ही गोष्ट शांतपणे सांगायला आलो आहोत. यापुढे आम्ही तुम्हाला शांतपणे सांगणार नाही. आमच्याकडे तुमच्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे, असा इशाराही रवींद्र धंगेकर यांनी दिला. यावेळी सुषमा अंधारे, धंगेकरांनी पब आणि हॉटेल्सच्या हप्त्यांची भलीमोठी यादीच वाचून दाखवली. ही तर कशी आहेराची यादी आहे असेही त्या यावेळी म्हणाल्यात.

हफ्ते वसूल करणाऱ्या पोलीस कर्मचारी यांची नावे तसेच वसूली रेटची यादी बघता येत्या काही दिवसात हे प्रकरण अधिक चिघळणार असा अंदाज आहे. ह्या प्रकरणातील काय ती सत्यता लवकरात लवकर बाहेर यावी अशी नागरिकांची इच्छा आहे.

ठाकरे आणि काँग्रेसच्या शिलेदारांचा हल्लाबोल :
पुणे येथील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर काँग्रेसचे आमदार धंगेकर राज्य सरकार विरुद्ध आवाज उठवत असून त्यांना आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांची साथ मिळाली आहे. सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावरुन महायुतीच्या मंत्र्‍यांना धारेवर धरत पुण्यात दर १५ दिवसांनी गांजा आणि ड्रग्ज सापडत असेल, तर उत्पादन शुल्क विभाग काय करतोय? संबंधित खात्याच्या मंत्र्‍यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही का? अधिकारी त्यांचे आदेश ऐकत नाहीत का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. सुषमा अंधारे यांनी मंत्री शंभुराज देसाई यांना देखिल लक्ष्य केले. आम्ही काही बोललो तर एक्साईज खात्याचे मंत्री तसेच आरोग्य प्रशासन विभागाचे मंत्री आमच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्याची भाषा करतात. आमच्यावर केस करण्यापेक्षा तुमच्या अधीन असणाऱ्या अधिकाऱ्यांना बोला, असे खडेबोल सुषमा अंधारे यांनी यावेळी संबंधित मंत्र्यांना सुनावले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!