Home » क्रीडा » आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यात हैदराबादचा धुव्वा उडवत केकेआर विजेता

आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यात हैदराबादचा धुव्वा उडवत केकेआर विजेता

चेन्नई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यात आज केकेआरने चॅम्पियन्सला साजेसा खेळ करत आयपीएल २०२४ च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. केकेआरच्या गोलंदाजांनी या विजयात सिंहाचा वाटा राहीला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत केकेआरने हैदराबादला फक्त ११३ धावांवर रोखले. त्यामुळे केकेआरला विजयासाठी ११४ असे माफक आव्हान मिळाले. केकेआरने हे आव्हान ९.५ षटकात पूर्ण करत तिसऱ्यांदा आयपीएलच्या विजेतेपदाला गवसणी घातली.

केकेआरने अंतिम सामन्यात हैदराबादवर ८ विकेट्स राखून विजय मिळवला. हैदराबादच्या ११४ धावांचा पाठलाग करताना केकेआरला सुरुवातीलाच धक्का बसला तो सुनील नरेनच्या रुपात. पॅट कमिन्सने त्याला ६ धावांवर असताना बाद केले. पण त्यानंतर फलंदाजीला आलेल्या व्यंकटेश अय्यरने स्पोटक फलंदाजी केली. व्यंकटेशला यावेळी सलामीवीर रहमतुल्लाह गुरबाजने चांगली साथ दिली, तो ३९ धावांवर बाद झाला. पण व्यंकटेशने अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला.

दरम्यान हैदराबादच्या डावात मिचेल स्टार्कने आपल्या पहिल्या षटकात अभिषेक शर्माला बाद केले. पाठोपाठ धडाकेबाज सलामीवीर ट्रेव्हिस हेड शून्यावर बाद झाला. त्यानंतर स्टार्कने हैदराबादला पुन्हा एक धक्का देत राहुल त्रिपाठीला ९ धावांवर बाद केले आणि संघाला तिसरे यश मिळवून दिले.

हैदराबादची ३ बाद २१ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर हैदराबादकडून चौथ्या विकेटसाठी २६ धावांची भागीदारी झाली. ही भागीदारी वाढत चालली होती, तेव्हा हर्षित राणाने हैदराबादला दोन मोठे धक्के दिले. राणाने नितिष कुमार रेड्डीला १३ धावांवर बाद केले. त्यानंतर धोकादायक वाटत असलेल्या हेन्रीच क्लासिनला बाद केले.

आंद्रे रसेलने दोन विकेट्स मिळवल्या. त्याने एडन मार्करम २० धावांवर आणि हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सला २४ धावांवर बाद केले. केकेआरच्या गोलंदाजांनी यावेळी अचूक आणि भेदक मारा केला. केकेआरकडून रसेलने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. स्टार्क आणि राणा या दोघांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!