Home » महाराष्ट्र » फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळले दोन मृतदेह ; घटनास्थळी सापडली सुसाईड नोट

फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळले दोन मृतदेह ; घटनास्थळी सापडली सुसाईड नोट

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मुंबईत एकाच घरात दोन मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एक ६१ वर्षीय व्यक्ती खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत होता, तर त्याची ५७ वर्षीय पत्नी त्याच्या शेजारी मृतावस्थेत पडली होती. फ्लॅटमधून दुर्गंधी आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा उघडला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, कांदिवलीत आर्य चाणक्यनगर येथील अनुभूती सोसायटीमध्ये रविवारी येथील एका फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी पोलिसांकडे केली होती. माहिती मिळताच पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. तेव्हा त्यांना फ्लॅटचा दरवाजा आतून बंद दिसला. अनेक प्रयत्न करूनही दरवाजा न उघडल्याने पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. पोलिसांनी एक खोली उघडली असता त्यामध्ये पती पत्नीचे मृतदेह आढळून आले. समता नगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, त्यांना प्रमोद वासुदेव चोणकर हे सिलिंग फॅनला नायलॉनच्या दोरीने लटकलेले दिसले आणि त्यांच्या शेजारी त्यांची पत्नी अर्पिता प्रमोद चोणकर मृतावस्थेत पडलेल्या आढळल्या. मृतदेह कुजले होते, असं अधिकाऱ्याने सांगितले. सध्या ही हत्या की आत्महत्या याचा तपास सुरू आहे. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या जोडप्याला मूलबाळ नव्हतं.

पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली आहे ज्यामध्ये मयत व्यक्तीने नमूद केलं आहे की ते मानसिकदृष्ट्या खचले आहेत आणि स्वतःच्या इच्छेने हे पाऊल उचलत आहे. तसंच यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे. १३ मे रोजी दोघांनी ही घटना घडवून आणल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या समता नगर पोलिसांनी एडीआरची नोंद करून तपास सुरू केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!