Home » महाराष्ट्र » घाटकोपर येथील होर्डिंग कोसळल्याप्रकरणी भावेश भिंडे यास २६ में पर्यंत पोलीस कोठडी

घाटकोपर येथील होर्डिंग कोसळल्याप्रकरणी भावेश भिंडे यास २६ में पर्यंत पोलीस कोठडी

मुंबई | दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – घाटकोपर होर्डिंग प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक भावेश भिंडे याला उदयपूर येथील हॉटेलमधून अटक केली असून मुंबई न्यायालयाने त्याला २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यानच्या तपासात आढळून आले की, भावेशने या हॉटेलमधील रूम स्वतःच्या नव्हे तर त्याच्या एका नातेवाईकाच्या नावावर बुक केले होते.

भावेश हा देखील सगळ्याच ठिकाणी डिजिटल पेमेंट करत असे. मात्र घाटकोपर दुर्घटनेनंतर मुंबईतून पळून जातांना त्याने बरीच रोकड सोबत ठेवली होती. तपास यंत्रणांना त्याचा कुठेही पत्ता लागु नये, तसेच लोकेशन कळू नये यासाठी दरम्यानच्या ठिकाणी आर्थिक व्यवहार रोखीने केला, असे केल्याने तपास पथक आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, असा त्याला विश्वास होता. तपासादरम्यान पथकाने भावेशच्या घरातील सर्व सदस्यांचे मोबाईल ताब्यात घेतले होते.

भावेश उदयपूर येथील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळताच तेथे जाऊन तपास पथकातील एका अधिकाऱ्याने वेटरची भूमिका साकारत खोलीचा दरवाजा ठोठावला. भावेशने आतुन दार उघडताच समोर मुंबई क्राईम टीम पाहून तो दचकला. मात्र अटकेदरम्यान त्याने कुठलाही विरोध केला नाही. त्याला ताब्यात घेतल्यानंतर गुन्हे शाखेकडून त्याच्या बँक खात्यांची चौकशी करण्यात येत आहे.

याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने अजून काही जणांची चौकशी केली आहे. तसेच ज्या व्यक्तीच्या आधारकार्डवर भावेशने उदयपूरमध्ये हॉटेल बुक केले आणि ज्या हॉटेल कर्मचाऱ्याने दुसऱ्याच्या ओळखपत्रावर भावेशला खोली दिली त्याचीही गुन्हे शाखेकडून चौकशी केली जाणार आहे, कारण हा देखील एक गुन्हाच आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!