मुंबई | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ सुरु असतांना भारतीय निवडणूक आयोगाने राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकांचे जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार विधान परिषदेच्या २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांसाठी १० जून रोजी मतदान होऊन १३ जून रोजी मतमोजणी होणार होती. आता ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पुढे ढकण्यात आली आहे.
सदर निवडणुका पुढे ढकण्यात याव्या अशी मागणी अनेक शिक्षक संघटनांनी केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले आहे. माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा समन्वयक तुळशीराम सोनवणे यांनी आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
या निवडणुकीसाठी १० जून ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र मे महिन्याच्या सुट्टीसाठी बाहेर गेलेल्या शिक्षक आणि कर्मचारी तसेच सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या ड्यूटीमुळे मतदान करता येणे शक्य नव्हते. म्हणून शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी आमदार कपिल पाटील यांच्या सोबत दिल्लीत जाऊन भारत निर्वाचन आयोगाकडे निवडणुकीच्या तारखा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे शिक्षक भारतीच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच शिक्षक संघटनांनी देखील निवडणूक आयोगाला याबाबत निवेदन दिले होते.
त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने या मागणीचा विचार करून महाराष्ट्र विधानपरिषद शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवाषिक निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
दरम्यान मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन वसंत डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल हरिश्चंद्र पाटील हे ७ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.
