Home » कृषी » मतदान होताच कांद्याच्या दरात मोठी घसरण ; बळीराजाला मोठा फटका

मतदान होताच कांद्याच्या दरात मोठी घसरण ; बळीराजाला मोठा फटका

सोलापूर | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दारफळ येथे कांद्याला अत्यंत कमी दर मिळाला आहे. येथे एका शेतकऱ्याच्या ९३ कांद्याच्या पिशव्याची पट्टी फक्त १०००० रुपये आली आहे. त्यांच्या कांद्याला प्रतिकिलो १ ते ६ रुपयांचा दर मिळालाय.

कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे. कांदा पिकवण्यासाठी केलेला खर्च देखील निघणं कठीण झालेलं दिसत आहे. पृथ्वीराज चव्हाण नामक या शेतकऱ्याने सोलापूर मार्केटमध्ये एका ट्रेडर्सकडे ९३ पोती कांदा विकला. या कांद्याची पट्टी फक्त १०००० रुपये आली. या पट्टीतून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च देखील निघाला नाही. असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.

दरम्यान, सोलापूर आणि माढा मतदारसंघात लोकसभेसाठी ७ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. निवडणुकीच्या तोंडावर केंद्र शासनाने निर्यातबंदी उठवली म्हणून नुसता बोभाटा केला. निवडणूक होईपर्यंत भाव हजार, बाराशे टिकवून ठेवला. मात्र, निवडणूक संपताच भाव फक्त १०० रुपयांवर आला असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. चांगल्या प्रतिचा एक नंबरच्या कांद्याला ६२५ रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. तर दोन नंबरच्या कांद्याला ३०० रुपये प्रतिक्विंटल, तीन नंबरच्या कांद्याला २०० रुपये प्रतिक्विंटल तर चार नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल १०० रुपयांचा दर मिळाल्याची माहिती शेतकरी पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान, या कांद्याची पावती सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!