Headlines
Home » महाराष्ट्र » नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात दोन आरोपींना सश्रम जन्मठेप ; सबळ पुराव्याअभावी तीन निर्दोष

नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात दोन आरोपींना सश्रम जन्मठेप ; सबळ पुराव्याअभावी तीन निर्दोष

पुणे | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात पाच आरोपींपैकी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर ज्यांच्यावर कट रचल्याचा आरोप होता त्या वीरेंद्र तावडेसह संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या तीघांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले.

या प्रकरणात आरोपींना तब्बल ११ वर्षांनी शिक्षा झाल्याने दाभोलकर कुटुंबाने समाधान व्यक्त केले आहे. मात्र तिनही निर्दोष आरोपींविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे ते म्हणाले. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यामध्ये २० ऑगस्ट २०१३ रोजी ओंकारेश्वर मंदिराजवळ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी सकाळी सव्वासातच्या सुमारास दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या होत्या. विचारवंताची हत्या झाल्यामुळे पुरोगामी आवाज हा शोकसागरात बुडाला होता.

दरम्यान दाभोलकर हत्या प्रकरणात साक्ष नोंदवतांना सीबीआयकडून कोर्टात महत्वाच्या साक्षीदाराला हजर करण्यात आले होते. त्यात सफाई कर्मचाऱ्याने १९ मार्च २०२२ रोजी दाभोलकर हत्या प्रकरणात सुनावणीमध्ये सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला ओळखले होते. दोघांनी दाभोलकरांवर गोळीबार करून फरार झाल्याची साक्ष पुणे महापालिकेच्या त्या सफाई कर्मचाऱ्याने दिली होती. आरोप निश्चित झाल्यानतंर २०२१ पासून खटल्याची सुनावणी सुरु झाली होती. सुनावणीमध्ये २० साक्षीदार तपासण्यात आले होते.

दाभोलकर यांच्या हत्याकांड प्रकरणात आरोपी सापडत नसल्याने तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता. कर्नाटकमधून अमोल काळेला तर नालासोपाऱ्यातुन वैभव राऊतला ताब्यात घेतले. वैभवच्या घरात शस्त्रास्त्रे सापडली होती. वैभवच्या तपासात शरद कळसकरला ताब्यात घेतल्यानंतर पुढील तपासात कळसकरने सचिन अंदुरेच्या मदतीने दाभोलकरांची गोळ्या झाडून हत्या केल्याचे कबूल केले होते.

अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात निष्काळजीपणा :
आरोपींवर संशय घेण्यास पुरेसे पुरावे असताना देखील तपास अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे तपास न केल्यामुळे तसेच तपासात निष्काळजीपणा दाखवल्यामुळे तीन आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. तसेच युएपीएचे कलम सिद्ध होऊ शकले नाही, असे न्यायाधीशांनी निकालात नमूद केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!