Home » राजकीय » लोकसभा निवडणुकीत क्रांतीची मशाल पेटवा : उन्मेषदादा पाटील

लोकसभा निवडणुकीत क्रांतीची मशाल पेटवा : उन्मेषदादा पाटील

भडगावातील सभेत मविआ नेत्यांचा सत्ताधार्‍यांवर जोरदार हल्लाबोल

भडगाव | दि.९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – यंदाची लोकसभा निवडणूक ही देशातील विकासासाठी आणि दडपशाहीला चाप लावण्यासाठी आहे. या निवडणुकीत क्रांतीची मशाल पेटवून महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन माजी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केले. ते भडगावात आयोजीत सभेत बोलत होते. याप्रसंगी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधार्‍यांवर कडाडून प्रहार केले.

जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारासाठी भडगावातील आझाद चौकात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले.

या सभेला माजी खासदार उन्मेष पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मुफ्ती हारून नदवी, शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख जे.के. पाटील, उपजिल्हा प्रमुख दीपक पाटील, शहरप्रमुख शंकर मारवाडी, माजी नगरसेविका योजना पाटील, माजी सभापती रामकृष्ण पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक इसाक मलीक, राजू देशमुख, अभिषेक प्रदीप पवार, दीपक महाजन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित वक्त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर कडाडून टिका केली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मुफ्ती हारून नदवी यांनी आपल्या अतिशय आक्रमक भाषणातून सरकारवर हल्लाबोल करतांनाच तेरा मई बीजेपी गयी ! असा नारा बुलंद करताच त्यांना भरभरून दाद मिळाली.

वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सर्व काही निष्ठेने विकत घेता येत असले तरी निष्ठा विकत घेता येत नसल्याचे नमूद करतांनाच सत्ताधार्‍यांवर कडाडून प्रहार केला. लोकसभा निवडणूक ही आपल्या स्वाभीमानाची आणि संविधान वाचवण्यासाठीची निवडणूक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी मोदींनी जनतेला फसविले असल्याचा आरोप आपल्या मनोगतातून केला. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार म्हणाले की, भाजपला ३२ टक्के मते मिळाली असली तरी उर्वरित मते फुटल्याने त्यांना विजय मिळाला होता. मात्र आता सर्वांनी एकजुटीने भाजपला हरविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.

माजी खासदार उन्मेष पाटील यांनी आक्रमक शैलीत सत्ताधार्‍यांना झोडपून काढले. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्ष बहुजनांच्या विरोधातील आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाषा एकाकडे करतांनाच दुसरीकडे सदावर्ते यांच्या सारख्यांना गिरीश महाजन व देवेंद्र फडणवीस पुढे करत असल्याची टिका त्यांनी केली. सत्ताधार्‍यांना प्रॉपर्ट्या जमा करण्यात रस असून ते पैशांचे राजकारण करत आहेत. तर आमदार किशोर पाटील व गिरीश महाजन यांनी गिरणेवरली बलून बंधार्‍यांसाठी काहीही केले नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला. पाचोरा व भडगाव तालुका हा दुष्काळग्रस्त नव्हे तर दुष्काळसदृश्य घोषीत केल्यामुळे शेतकर्‍यांचे दीडशे कोटींचे नुकसान झाल्याची टिका त्यांनी केली. किशोर पाटलांनी लोकशाहीचा खून केल्याचे टिकास्त्र त्यांनी सोडले.

याप्रसंगी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार, आप आदी पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!