मुंबई | दि.९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्रात नागरिक उष्णतेच्या लाटेने हैराण असतांनाच पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पूर्व विदर्भात गारपीट तसेच वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात काही भागात आज अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. तिकडे कोकणात उकाडा वाढला असुन मुंबईसह कोकण विभागात उष्णतेची लाट दिसत आहे. पुढील चार दिवस मुंबईसह कोकण पट्टात उन्हाचा तडाखा क़ायम असणार आहे.
पूर्व विदर्भाला अवकाळी पावसासह गारपिटीने चांगलचं झोडपलं आहे. दरम्यान पूर्व विदर्भात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे फळबागांसह शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. आयएमडीच्या अंदााजानुसार, विदर्भासह मराठवाड्यात १२ मे पर्यंत पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, वाशीम, बुलढाणा आणि नांदेड येथे काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
