जळगाव | दि.८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार करण पाटील ह्यांच्या प्रचारार्थ जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर इंडिया-महाविकास आघाडीची संयुक्त जाहीर सभा पार पडली. सभेसाठी मैदान लोकांनी संपूर्ण भरल्याने बरेच जण मैदानाबाहेर उभे होते. घोषणांनी परिसर दणानुन गेला होता. यावेळी उपस्थित लोकांमध्ये जबरदस्त उत्साह बघायला मिळाला.


सुरुवातीला महाविकास आघाडीच्या मित्रपक्षातील प्रमुख नेत्यांनी सभेला संबोधित केले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवर तूफान हल्ला चढवत सर्वांनीच भाजपामधील ‘संकट मोचन’ यांचा चांगलाच समाचार घेतला. माझी इच्छा नसतांनाही मला २०१९ ला लोकसभा लढवायला लावल्याचे सांगत माजी खासदार उन्मेष पाटील यांनी स्थानिक नेत्यांच्या एकूण कार्यपद्धतीवर हल्ला चढविला. जिल्ह्यात ३ मंत्री असून देखील जिल्ह्याचा विकास रखडला आहे, त्यामुळे आता जिल्ह्यातील हुक़ूमशाहीला मोडीत काढण्याचे आवाहन माजी मंत्री डॉ. सतीष पाटील यांनी केले.

राज्यात लोकशाही मार्गाने केली जाणारी आंदोलनं पैशांच्या जोरावर मोडण्याचे काम गिरीश महाजन करत असल्याचा आरोप, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी केला. तसेच त्यांनी गेल्या दोन महिन्यात म्हणजे मार्च आणि एप्रिल मध्ये ४५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले.


जेष्ठ कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी असली शिवसेना आणि नकली शिवसेने बाबत निडणूक आयोगाच्या निर्णयावरुन भाजपला चांगलंच धारेवर धरलं. तसेच असीम सरोदे यांनी सांगितले की घटनेत आजही ३७० कलम असून जनतेची निव्वळ दिशाभूल केली जात आहे, जम्मू कश्मीर मधे अदानी यांना जमीन विकत घेता यावी यासाठी प्रयत्न केले गेले. जगातील ७ व्या क्रमांकाचा लिथेनियम साठा जम्मू कश्मीर मध्ये असल्याने सगळ्यात जास्त जमीन अदानी यांनी विकत घेतली.
तमाम देशभक्तांनी हातात मशाल घेतली असून, आता दिल्लीची हुकूमशाही जाळायला जनता तयार आहे,’ ह्याची ग्वाही देणारी ही सभा होती. ह्या सभेत एकच नारा घुमला, तो म्हणजे लोकशाही रक्षणाचा. ‘आम्ही दिल्लीकरांना गुडघ्यावर आणतोय. महाराज, आम्ही शपथ घेतलीय; तुमच्या स्वाभिमानाला आम्ही कलंक लागू देणार नाही,’ असा एल्गार पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना केला. जे गेले त्यांना विसरा असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणात शिंदे सेनेवर टिका करण्याचे टाळले.

आपल्या कार्यपद्धतीवर बोलतांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांनी काका पुतण्याला फोडले तर आम्ही काका पुतण्याला जोडले, असे सांगत माजी मंत्री डॉ. सतीष पाटील आणि मविआचे उमेदवार करण पाटील यांना व्यासपीठावर आपल्या जवळ बोलवून घेतले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या आवाजात जोरदार प्रतिसाद दिला.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार करण पाटील-पवार यांनी आपल्या लोकसभा मतदार संघात प्रचारा दरम्यान निष्ठावंत शिवसैनिक व कार्यकर्त्यांकडून मिळणाऱ्या पाठींब्यामुळे आभार व्यक्त करून भरघोस मताधिक्क्याने विजयी करून देण्याचे आवाहन सभेसाठी उपस्थित जनसमुदायास केले.
यावेळी सभेला माजी खासदार उन्मेष पाटील, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार, जळगावच्या माजी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे, धुळे जिल्हा संपर्कप्रमुख अशोक धात्रक, जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे तसेच इंडिया – महाविकास आघाडीच्या मित्रपक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.
